आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंडी फुटली, दिल्ली विधानसभा विसर्जित; फेब्रुवारीत नव्याने निवडणुका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठ महिन्यांच्या राजकीय अनिश्चिततेनंतर अखेर दिल्ली विधानसभा मंगळवारी बरखास्त करण्यात आली. दिल्लीत आता जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नव्याने निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभा बरखास्त करण्याच्या राज्यपालांच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला प्रस्ताव आता राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या आत विधानसभेची निवडणूक घ्यावी लागेल. दरम्यान, दिल्लीतील तिन्ही मोठ्या राजकीय पक्षांनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. या निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार प्रोजेक्ट करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मते मागण्याचा इरादा भाजपने स्पष्ट केला आहे.

भाजपचा हा इरादा असला तरीही जगदीश मुखी हे भाजपचा चेहरा असतील, त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी अरविंद केजरीवाल आणि मुखी यांच्यातच सामना होईल,असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे, तर काँग्रेसने अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

* भाजप मागणार मोदींच्याच नावावर मते

कोणाची काय स्थिती?
भाजप
सकारात्मक : दिल्लीत लोकसभेच्या सात जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्र व हरियाणात सरकार स्थापन केले. मोदी लहर कायम आहे, असे भाजपला वाटते.
नकारात्मक : ज्याचा नावावर मते मागता येतील, असा एकही चेहरा भाजपकडे नाही. ‘आप’ तोच मुद्दा रंगवण्याच्या बेतात आहे.
आप
सकारात्मक : ४९ दिवसांच्या सरकारची कामगिरी. विधानसभा विसर्जनाच्या विलंबास भाजपला जबाबदार धरून लाभ उठवण्याची शक्यता.
नकारात्मक : ‘पळपुट्यांचा पक्ष’ या प्रतिमेतून बाहेर पडण्याचे आव्हान. अनेक बडे नेते बाहेर. संघटन कमकुवत.
काँग्रेस
सकारात्मक गमावण्यासारखे काहीच नाही. १५ वर्षांच्या सत्तेतील त्रुटींचा लोकांना बराच विसर पडला आहे. त्यामुळे भाजपला भक्कम पर्याय ठरण्याची शक्यता.
नकारात्मक
आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले. नेतृत्वातही आत्मविश्वासाचा अभाव.

सध्याचे पक्षीय बलाबल
०८ काँग्रेस
२९ भाजप
०३ इतर
२७ आप
विद्यमान आमदार ६७

उशिरा उपरती
उपराज्यपालांनी आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. पण भाजपच्या दबावामुळे त्यांनी ते केले नाही. दिल्लीत कोणीचेही सरकार येण्याची स्थिती नसल्याची उपरती त्यांना सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतरच झाली.
- शकीलअहमद, काँग्रेस नेते

दिल्ली जिंकली, भाजप हरला
‘दिल्ली जिंकली, भाजप हरला. भाजपने काळ्या पैशाच्या जोरावर ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत काही ठिकाणी भाजप दंगली घडवू शकते.’
- अरविंद केजरीवाल, आप नेते

मोदी हाच मुद्दा
‘नरेंद्रभाई आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्याच नावावर निवडणूक लढवू.निवडणूक लढणे, जास्तीत जास्त जागा जिंकणे, स्पष्ट बहुमत मिळवणे आणि मग मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित करणे हाच आमचा सध्या उद्देश आहे’.
-प्रभात झा, भाजपचे दिल्ली प्रभारी