आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly Election: Last Day Shila Critised On Gujrat Model

दिल्ली विधानसभा निवडणूक: शेवटच्या दिवशी शीला यांची गुजरात मॉडेलवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी गुजरात मॉडेलला नाकारले. नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. शीला यांनी सर्व आकडे सांगून दिल्ली व गुजरातची तुलनात्मक माहिती स्पष्ट करताना दिल्ली किती सरस आहे, याचा दावा केला.युनायटेड नेशन्सच्या सिव्हिएर पॉव्हर्टी इंडेक्सचा हवाला देताना दिल्लीत गरिबी 3 टक्के आहे, तेथे गुजरातमध्ये 19 टक्के असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिल्लीत सामाजिक क्षेत्रामध्ये सरकार 47.9 टक्के खर्च करते. त्यामुळे राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. तेथे गुजरातमध्ये तुलनेने 37.6 टक्के खर्च होतो. गुजरात देशात 21 व्या स्थानावर आहे. नॅशनल स्कूल गेम्समध्ये दिल्ली (293 पदकांसह) अव्वलस्थानी आहे. गुजरात (19 पदके) 13 व्या क्रमांकावर आहे. दिल्लीत प्रतिलाख लोकसंख्येसाठी 39 टक्के बस आहेत. गुजरातमध्ये अहमदाबादेत प्रतिलाख लोकसंख्येसाठी 15.8 व उर्वरित राज्यात 14.78 टक्के बस आहेत, असा दावा दीक्षित यांनी केला.
हरितपट्ट्यातही दिल्लीने 1998 (1.3 टक्के) च्या तुलनेत खूप प्रगती केली आहे. 2011 हे प्रमाण 20 टक्के झाले आहे. गुजरातमध्ये 2003 च्या 13 टक्क्यांच्या तुलनेत 2011 मध्ये तो 11 टक्क्यांवर आला. आता आपण गुजरातचे मॉडेल आणून दिल्लीचे पतन करणार आहोत का, असा सवालही दीक्षित यांनी सभेत उपस्थित केला. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीत वीज स्वस्त आहे. विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.