आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly Election Result : Many Big Leaders Of BJP Congress Defeated In Delhi

दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल: दिल्लीत भाजप-काँग्रेसच्या अनेक बड्यांचा सुपडा साफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकीकडे जसा दारुण पराभव झाला, तसाच फटका भाजपलाही बसला. दोन्ही पक्षांच्या तगड्या उमेदवारांचे चीतपटही धक्कादायक ठरले. मुख्यमंत्रिपद तीन वेळा सांभाळणा-या शीला दीक्षित, चार वेळा आमदार राहिलेले भाजपचे ए.के. वालिया आणि विजेंदर गुप्ता यांनाही आपले सुभे राखण्यात अपयश आले.
दिल्लीतील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी दीक्षित यांचा 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यात विजेंदर रिंगणात तिस-या स्थानी राहिले. केजरीवाल यांना 44 हजार 269 मते पडली. दीक्षितांना 18 हजार 405 मतांपर्यंतच मजल मारता आली. गुप्ता यांना 17 हजार 952 मते पडली. दिल्ली निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचे उमेदवार असलेल्या किरण वालिया यांचा पराभवदेखील असाच चकित करणारा ठरला. मालवीयनगर मतदारसंघातील लढतीत वालिया यांना तिस-या क्रमांकावर राहावे लागले. तेथेही आपचे सोमनाथ भारती यांनी विजयाची मोहोर उमटवली. त्यांना 32 हजार 258 मते मिळाली. वालिया केवळ 20 हजार 500 मतांवर राहिले. आरती मेहरा यांना 24 हजार 486 एवढी मते मिळाली. आरोग्य व कुटुंब मंत्री ए.के. वालिया यांच्या नशिबीदेखील पराभव आला. त्यांचा पराभव आपचे विनोदकुमार बिन्नी यांच्याकडून झाला. लक्ष्मीनगर मतदारसंघातील या लढतीत बिन्नी यांनी 8 हजारांची आघाडी घेऊन विजय नोंदवला.
काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजकुमार चौहान हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या या दिग्गजाला आपच्या उमेदवाराकडून पराभूत होण्याची वेळ आली. 26 वर्षांच्या राखी बिर्ला यांच्याकडून चौहान यांचा 10 हजार 585 मतांनी पराभव झाला. भाजपचे उमेदवार किशोर नवारिया लढतीत तिस-या स्थानी राहिले. वाहतूक मंत्री रमाकांत गोस्वामी यांचा राजेंदर नगर मतदारसंघातून पराभव झाला. तेथे भाजपचे उमेदवार आर.पी. सिंह यांचा विजय झाला. माजी विधानसभा अध्यक्ष डॉ. योगानंद शास्त्री यांनाही निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.