आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: Prashant Dixit Article On AAP And BJP

मोदींचा जनतेला फटीग आला? दिल्लीत झाला लाजीरवाणा पराभव (प्रशांत दीक्षित)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फटीग फॅक्टर नावाची गोष्ट मार्केटमध्ये नेहमी बोलली जाते. एखाद्या गोष्टीचा इतका अतिरेक होतो की माणसांना काही काळाने त्याचा वैताग येऊ लागतो. मोदींच्या जाहिरातबाजीचा भाजपकडून काहीसा अतिरेक झाला व त्याची तीव्र प्रतिक्रिया दिल्लीतील जनसामान्यांमध्ये उमटली. परिणामी भाजपला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.
अर्थात दिल्लीच्या पराभवाला हे एकच कारण नाही. आर्थिक धोरणांपासून अनेक वेगवेगळी कारणे त्यामागे आहेत. फटीग हे त्यामधील एक महत्वाचे कारण होते व आहे. त्या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम मतांचे ध्रुवीकरण होण्यात झाला.

मात्र हे ध्रुवीकरण इतके तीव्रपणे व इतक्या लवकर होईल ही अपेक्षा कोणालाच नव्हती. आप सत्ता मिळविणार असे सर्व मतदानोत्तर चाचण्यांमध्ये दिसून आले होते. तथापि, योगेंद्र यादव तेव्हाही सांगत होते की आपला तुम्ही अजूनही कमी लेखत आहेत. आपची लाट नसून सुत्नामी आहे असे त्यांचे मत होते. ते शब्दश: खरे ठरले. सेफॉलॉजीतील त्यांच्या अचूकतेला दाद दिली पाहिजे.
Related Placeholder
भाजप पराभवाच्या अन्य कारणांची चर्चा करण्यापूर्वी मोदी फटीगकडे पुन्हा वळूया. मोदींनी सत्ता हाती घेतल्यावर परराष्ट्रीय राजकारणात उत्तम कामगिरी करून दाखविली. राष्ट्रनेता म्हणून मोदी जगातील प्रमुख महासत्तांशी कसे बरोबरीने वागत होते याचे कौतुक सुरू झाले. तसे पाहिले तर आधीच्या पंतप्रधानांची परराष्ट्रीय कामगिरीही उल्लेखनीय होती. मोदींपेक्षा जास्त मान अन्य देशांत मनमोहनसिंग यांना होता व आहे. दीड वर्षापूर्वी मनमोहनसिंग चीनला गेले होते तेव्हा तेथील पंतप्रधानांनी त्यांना स्वत: ड्राइव्ह करीत नेले. परराष्ट्रीय प्रोटोकॉलमध्ये याला खूप महत्व दिले जाते.

मात्र मनमोहनसिंग यांनी कधी जाहिरातबाजी केली नाही. मोदींनी ती केली. नुसती केली नाही तर अलिकडे त्याला बटबटीत स्वरुप येऊ लागले. ओबामांशी जवळीक दाखविण्यासाठी वेळोवेळी केलेला बराक असा उल्लेख हा अमेरिकनांबरोबर भारतीयांनाही खटकला. त्याचबरोबर पोशाखांची आतषबाजीही लोकांना नाराज करून गेली. मुत्सद्दी म्हणून प्रतिमा उभी करण्यापेक्षा रॉक स्टार सारखी प्रतिमा मोदींनी उभी केली व तीच दिल्लीत भाजपच्या मुळावर आली.

ओबामा यांनी रॉक स्टार असाच मोदींचा उल्लेख केला होता. रॉक स्टार लोकप्रिय असतो पण भारतीय जनतेला आपला नेता स्टार झालेला आवडत नाही. मोदींसमोर मफलर गुंडाळून केजरीवाल होते. ते जनतेची भाषा बोलत होते. मोदी न्यूयॉर्क, कॅनबेरा, शांघाय, इथल्या गोष्टी करीत असताना केजरीवाल त्रिलोकपुरी, पटपटगंज, कॅनॉट अशा दिल्लीतील मोहल्ल्यांचे उल्लेख करीत होते. तेथील लोकांबरोबर रोज उठत-बसत होते. त्यांच्या समस्या समजून घेत होते. मुख्य म्हणजे गेल्या वेळी राजीनामा देण्यात चूक झाली असे प्रामाणिकपणे कबुल करीत होते.

याउलट मोदींची प्रतिमा ही काहीशी उद्धट होती. त्यांच्या भाषणांमध्ये सत्तेचा दर्प डोकावत होता. भाषा समझोत्याची असली तरी वागणूक कशी आहे हे दिल्लीकर पाहात होते. हर्षवर्धन यांना दिल्लीकर ३० वर्षे ओळखत होते. त्यांना कसे पद्धतशीरपणे बाजूला केले गेले हे दिल्लीकरांनी पाहिले. अमित शहा यांच्याकरवी मोदी सर्व सूत्रे स्वत:च्या हातात ठेवीत आहेत हेही लक्षात आले. भारतीय जनतेला सत्तेचे असे केंद्रीकरण आवडत नाही.

जाहिरातीतून होणारा मोदी, मोदी असा नारा, मोदींचे सतत चाललेले गुणगान, मोदींचे आवीर्भाव, श्रीमंत उद्योगपतींबरोबर त्यांचे उठणे बसणे, पोशाखातील श्रीमंती वैविध्य यामुळे उच्च मध्यमवर्ग सुखावत असला तरी गरीब मतदार दुरावत होता. या गरीबांनी लोकसभेत मोदींना पाठिंबा दिला होता. प्रतिमेत रंगलेल्या मोदींना हा दुरावा कधी लक्षात आला नाही. जनता आपल्या मुठीत आहे अशा कल्पनेत ते वावरत राहिले. मोदींच्या या अखंड गजरामुळे लोकांना मोदी या नावाचा कंटाळा येऊ लागला. बॉलीवूडमधील उदाहरण घ्यायचे तर मनमोहन देसाई व अमिताभ या जोडीचे पहिले काही चित्रपट लोकांना खूप आवडले. पण पुढे देसाईंच्या चित्रपटात अमिताभचे स्तोम इतके वाढत गेले की लोकांना कंटाळा आला आणि त्यानंतर या जोडीचे चित्रपट आपटले. तसाच प्रकार इथे झाला.

केवळ लोकांनाच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यांनाही मोदींचा कंटाळा आला. सब कुछ मोदी और शहा या वातावरणात अनेक जाणकार नेते व कार्यकर्ते स्वत:ला लांब ठेऊ लागले. झटून कोणीच काम केले नाही वा कोणी जबाबदारी उचलली नाही. याउलट स्थिती आपमध्ये होती. तेथे प्रत्येकजण पेटून उठला होता. भाजपमध्ये मरगळ आली होती.

तरीही जर उत्तम कारभार झाला असता तर मोदींची ही मिजासही चालली असती. नऊ महिने दिल्लीवर केंद्राचेच सरकार होते. पण ना कायदा- सुव्यवस्थेत फरक पडला, ना महागाई कमी झाली. निर्भया बलात्कार प्रकरणाने कॉँग्रेसची सत्ता गेली. हे भाजपने पाहिले असूनही दिल्लीतील महिलांवरचे अत्याचार रोखण्यास प्राधान्य दिले गेले नाही. कणखर नेता अशी मोदींची प्रतिमा दिल्लीतील महिलांना जाणवली नाही. उलट हिंदुत्ववाद्यांसमोर मूग गिळून बसणारे मोदी मुस्लीम व गरीब जनतेने पाहिले. पेट्रोल स्वस्त झाले असले तरी भाजी स्वस्त झाली नव्हती. दूध महागच होते व शाळांच्या फी परवड नव्हत्या. वीजेची बिले फुगत होती व पोलीस यंत्रणा भ्रष्ट असल्याचे रोज अनुभवास येत होते. गुजरातमध्ये गवगवा झालेला मोदींचा कामाचा झपाटा दिल्लीकरांच्या अनुभवास आला नव्हता. परकीय गुंतवणूक किती आली यामध्ये दिल्लीकरांना रस नव्हता. ओबामा मित्र की शत्रू यातही नव्हता. त्यांना स्वस्ताई हवी होती, भ्रष्टाचार नको होता. केजरीवाल यांनी फक्त याच दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. पगार वाढले असते तर जनतेने महागाईही सहन केली असती. पण पगार वाढत नव्हते व नवे रोजगारही मिळत नव्हते. यांना निवडून का दिले असा प्रश्न दिल्लीकरांना पडला होता.

मोदींनी स्वत:चा लोकांसमोर ठेवलेली प्रतिमा व लोकांना रोज अनुभविण्यास येणारे वास्तव यामध्ये दरी पडली होती. मोदींची मन की बात वा चाय पे चर्चा वा न्यूयॉर्कमधील भाषणांनी ही दरी भरून येणार नव्हती. मोदींना हे कुणीतरी खडसावून सांगायला हवे होते. पण अमित शहा वगळता मोदींशी बोलणार कोण?
आणि अमित शहा थोडेच खरे सांगणार होते?
परिणामी जनतेला मोदींचा फटीग आला व भाजपचे अक्षरश: वस्त्रहरण झाले.

अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या सुदैवाने अवघ्या आठ महिन्यांतच जनतेने इशारा दिला आहे. मोदींना सुधारण्यास अजून बरीच संधी आहे.
(पूर्ण)