आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly Election : Students Vote To Who Provide Campus Security

दिल्ली विधानसभा निवडणूक: कॅम्पसमध्ये सुरक्षा पुरवणा-यास विद्यार्थ्यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचारात विविध राजकीय पक्षांनी राजधानीतील पायाभूत सुविधा, महागाईवर चर्चा केली. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मात्र महिलांची सुरक्षा व रोजगाराच्या संधीला विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा काळ सुरू असल्यामुळे बुधवारच्या मतदानात विद्यार्थ्यांचा सहभाग काहीसा कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी, वाढती महागाई आणि महिलांची सुरक्षा या मुद्द्यांना महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले. सर्व पक्षांनी या गंभीर विषयांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनींना सुरक्षित वाटायला हवे. सुरक्षा हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची सचिव करिश्मा ठाकूरने सांगितले. कॅम्पसमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आश्वासन देणा-या पक्षाला विद्यार्थी पाठिंबा देणार आहेत. या परिसरात महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी तसेच महिला विभागही स्थापन केला जावा, अशी मागणी करिश्माने केली.
विद्यार्थी रोजगाराचे आश्वासन देणा-या पक्षाला पाठिंबा देणार आहे. रोजगाराचा गांभीर्याने विचार करणा-या पक्षाला विद्यार्थ्यांची पसंती आहे. करिश्मा ठाकूर एनएसयूआयकडून निवडून आली आहे. गेल्या वर्षी विद्यार्थी संसद ताब्यात होती तेव्हा करिश्माने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. लाचखोरीच्या मुद्द्यावर अभाविपच्या दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्ष रोहित छहालने भ्रष्टाचाराचा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी तेवढाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. महागाईमुळे बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयाच्या शुल्कातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती
सेमिस्टर परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मतदानाची टक्केवारी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तरीही विविध विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त मतदानासाठी सक्रिय आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदानासाठी मोटारसायकल रॅली, सभा, सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील 10 हजार विद्यार्थ्यांनी संकल्पपत्राद्वारे मतदान करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. निवडणुकीतील उमेदवार विश्वासू,लोकांची कामे करणारा तसेच तो सहज उपलब्ध होणारा असावा, अशी अपेक्षा कमला नेहरू कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या नमिताने व्यक्त केली.