आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly Elections: Kiran Bedi Ready To Give Challenge Kejriwal

दिल्ली विधानसभा निवडणूक: केजरीवालांना आव्हान देण्यास किरण बेदी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या एका दिवसानंतरच किरण बेदींनी भाजपच्या होर्डिंग्ज व बॅनरवर स्थान मिळवले आहे. १९ जानेवारीला दिल्लीच्या निवडणुक समितीच्या बैठकीनंतर त्यांची दिल्ली निवडणुकांसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, पक्ष आदेश असल्यास आपण आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणुक लढवू, असे मत किरण बेदी यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी भाजप कार्यालयात त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किरण बेदी यांचे भाषण भावी मुख्यमंत्र्यांच्या आवेषातच होते. त्यापूर्वी, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी किरण बेदी यांची जोरदार प्रशंसा केली. किरण बेदी यांचे दिल्लीतील कार्य आणि अनुभव खूप महान आहेत. त्यामुळे पक्षात त्यांची भूमिका महत्त्वाची व मोठी असेल.

ऑटोवर केजरीवाल आणि मुखींचे पोस्टर
दरम्यान, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ऑटोवर स्वत:चे आणि बीजेपी नेते जगदीश मुखी यांचे पोस्टर लावून यापैकी मुख्यमंत्री निवडण्याचे आवाहन केले होते. किरण बेदींच्या पक्षप्रवेशापूर्वी भाजपकडून जगदीश मुखी यांचे नाव मुख्यमंित्रपदासाठी आघाडीवर होते. मात्र, आता किरण बेदी यांचे नाव पुढे आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गोयल यांनी गुरुवारी बेदींच्या नावाला दुजोरा दिला. त्यांच्या नेतृत्वात भाजपला दिल्लीत दोन तृतियांश बहुमत मिळेल, असा आशावाद गोयल यांनी व्यक्त केला आहे.

केजरीवाल यांचे नकारात्मक राजकारण : बेदी
जनलोकपाल आंदोलनातील माजी सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावर किरण बेदी यांनी चांगलीच आगपाखड केली आहे. मी नेहमी सकारात्मक असते. दररोज सूर्य नमस्कार करते त्यामुळे मला सूर्याकडून ऊर्जा मिळते. परिवर्तनवादावर माझा विश्वास असून मला त्याचे महत्त्वही माहीत आहे, अशा शब्दांत बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी काही दिवसांपूर्वी किरण बेदी यांची तुलना जयचंद यांच्याशी केली होती. त्यावर किरण बेदी यांनी विश्वास यांना फैलावर घेतले. विश्वास हे चांगले कवी आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त कविता करण्याचेच काम करावे, असे बेदी यांनी म्हटले आहे.

निवडणूक लढणार नाही : शाजिया
किरण बेदी यांच्यासोबतच अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनात सक्रिय असलेल्या शाजिया इल्मी यांनीही शुक्रवारी भाजपची वाट धरली. इल्मी आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी आपकडून विधानसभा व लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, दोन्हीत त्यांचा पराभव झाला. शुक्रवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितित त्यांनी भाजपत प्रवेश केला. मी आयुष्यभरासाठी भाजपत आली असून मला निवडणूकही लढायची नाही तसेच पक्षाकडून मला अन्य कोणत्याही अपेक्षा नसल्याचे इल्मी यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना मी नेता मानत होते. मात्र, त्यांनी विश्वासघात केला. भाजपशी आपले मतभेद होते. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यामुळे मी प्रेरित होऊन या पक्षात आल्याचेही इल्मी यांनी म्हटले आहे.

भाजपत जाण्यापूर्वी बेदींनी माझा सल्ला घेतला नाही : अण्णा हजारे
किरण बेदी यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावर अण्णा हजारे यांना काहीच माहिती नाही. भाजपत प्रवेश करण्यापूर्वी बेदी यांनी मला फोनवरून किंवा अन्य कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. आमच्या शेवटच्या आंदोलनानंतर त्या राळेगणसिद्धीतही आल्या नाहीत आणि त्यांनी कधी संपर्कही केला नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.