आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Assembly News In Marathi, BJP, Divya Marathi

दिल्लीत लवकरच ‘कमळ’ उमलणार, सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी दिल्ली भाजपच्या अध्यक्षांनी आपल्या 28 आमदारांशी चर्चा केली. दुसरीकडे काँग्रेसच्या आठपैकी सहा आमदारांचे भाजपला समर्थन मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे राजधानीत कमळ उमलणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वास्तविक सरकार स्थापन करणे किंवा निवडणुकीला तोंड देणे याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेतील. मोदी सध्या ब्राझील दौ-यावर आहेत. आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिल्ली भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय मीडियाशी बोलताना म्हणाले, नायब राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले तर भाजप त्यावर जरूर विचार करेल. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. परंतु उपाध्याय यांनी बहुमत कसे मिळवणार, याचे उत्तर देण्याचे मात्र टाळले. निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी सरकार स्थापन करावे, अशी भूमिका बैठकीत सहभागी सर्व आमदारांनी मांडल्याचे सांगण्यात येते.

आमदारांचा घोडेबाजार
भाजपने सरकार स्थापनेसाठी काँग्रेस आमदारांचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी सहा आमदारांना प्रत्येकी 20-20 कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात येणार असल्याचा आरोप ‘आप’ चे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

पक्षीय बलाबल
एनडीए (भाजप+ अकाली)- 29, आप-28, काँग्रेस-8, अपक्ष-1, जदयू-1, रिक्त जागा-03
काँग्रेसचे समर्थन ?
काँग्रेसचे सहा आमदार अकाली दलाच्या एका आमदारासह वेगळा गट तयार करून भाजप सरकारला समर्थन देऊ शकतात.