आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीला दीक्षितांच्या विरोधात भाजपला उमेदवार मिळेना; मल्होत्रा, गोयल यांचीही तयारी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात भाजपला योग्य उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार मल्होत्रा, दिल्ली प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांच्यासह माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय जॉली यांनी दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

भाजपच्या नेतृत्वाने शिफारस केल्यानंतर या सर्व नेत्यांनी पराभवाच्या भीतीने रणांगण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 2008 मध्ये जॉली यांनी शीला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पराभवाच्या भीतीने हे तिन्ही नेते निवडणूक लढवण्यास नकार देत असल्याची माहिती आहे. या निवडणुकीत पराभव झाला तर आगामी राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याची भीती या नेत्यांना वाटत आहे.

या सर्व प्रकारामुळे भाजपच्या नेतृत्वाने आता मुख्यमंत्री शीला यांना टक्कर देण्यासाठी एखाद्या सशक्त उमेदवाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पक्षाने सुरुवातीला अभिनेत्री किरण खेर यांना शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी विचारणा केली होती. मात्र, किरण यांनीही त्या वेळी नकार दिला होता. त्यामुळे पक्षातर्फे आता शीला यांच्या विरोधात नूपुर शर्मा, माजी मंत्री सुनील यादव किंवा जिल्हा उपाध्यक्ष राजीव राणा उतरण्याची शक्यता आहे. तथापि हे उमेदवार तगडी लढत देतील का, याबाबत साशंकता आहे.

निवडणुकांसाठी शीला दीक्षित यांचे थीम साँग लाँच
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी ‘नहीं रुकेगी मेरी दिल्ली’ हे थीम साँग लाँच केले. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांचा आहे. ‘अनुभव है, रफ्तार है, काँग्रेस फिर इस बार है’ असे या गीताचे शीर्षक आहे. नवी दिल्लीतील चित्रपटगृहे आणि सर्व मतदारसंघांमध्ये हे गीत दाखवले जाणार असल्याचे शीला दीक्षित यांनी सांगितले. काँग्रेसने गेल्या 15 वर्षांत दिल्लीत केलेल्या विकासकामांची माहिती या गाण्यामध्ये देण्यात आली आहे. दिल्लीत धावणार्‍या मेट्रो ट्रेन, बस, सीएनजी रिक्षा, लाडली योजना, हॉस्पिटल, उड्डाणपूल या सर्वांचे वर्णन करून दिल्लीचे चित्र बदलत असल्याचे सांगण्यात आले आहे. या वेळी दिल्ली सरकारचे मंत्री अरविंदसिंह लव्हली, हारुण युसूफ, राजकुमार चव्हाण, आमदार मुकेश शर्मा आणि नसीब सिंह यांच्यासह गायक दलेर मेहंदी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सोमवारपासून स्वस्त दरात कांदा विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. सणांच्या कालावधीनंतर कांद्यासह इतर भाज्यांच्या किमतीही उतरणार असल्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात आली.