आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gang Rape Case: All Hearing Completed, Judgment On Friday

दिल्ली सामुहिक बलात्कार खटला: शिक्षेवर युक्तिवाद पूर्ण, निकाल शुक्रवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही नराधमांच्या विरोधात मंगळवारी शिक्षेची घोषणा होऊ शकली नाही. चौघांनाही मृत्युदंड देण्याची मागणी सरकार पक्षाचे वकील दयन कृष्णन यांनी केली. ते म्हणाले, गुन्हा रेअरेस्ट रेअर आहे. फाशीपेक्षा कमी काहीच नको. परंतु बचाव पक्षाचे वकील युक्तिवाद करतच राहिले. कधी राम, कधी नानक, तर कधी महात्मा गांधीजींचा दाखला देत राहिले. अखेर न्यायाधीशही वैतागले. म्हणाले, ‘शिक्षा कमी का करावी एवढेच तुम्ही सांगा?’ तीन तास हा युक्तिवाद सुरू होता. अखेरीस न्यायाधीश योगेश खन्ना यांनी निकाल शुक्रवारपर्यंत टाळला. युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता शिक्षेची घोषणा होईल.


तत्पूर्वी, न्यायालयाने मंगळवारी मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता व अक्षय ठाकूर या आरोपींना दोषी ठरवले आहे. गतवर्षी 16 डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये 23 वर्षीय विद्यार्थिनीवर अमानुष बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप चौघांवर सिद्ध झाला आहे. पाचव्या आरोपीलाही कोर्टाने दोषी ठरवले. परंतु त्याने आधीच तिहार तुरुंगात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.


फाशीच द्या : पीडित मुलीचे आई-वडील
मुलीने मृत्यूपूर्वीच या नराधमांना जिवंत जाळले पाहिजे असे म्हटले होते. - आई
ही एक ऐतिहासिक घटना होती, निर्णयही ऐतिहासिकच हवा. त्यामुळे पुन्हा कोणी धजावणार नाही
- पीडितेचे वडील


नराधम ओरडले, आम्ही निर्दोष आहोत
कोर्ट रूममध्ये नेताना कॉरिडॉरमध्ये असलेल्या पत्रकारांना पाहून चौघे आरोपी जोरात ओरडले, आम्ही निर्दोष आहोत
तीन तास : न्यायालयात युक्तिवाद, बाहेर फाशीसाठी निदर्शने
सामूहिक अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, पुरावे नष्ट करणे, कट, हत्येसाठी अपहरणाचा गुन्हा सिद्ध झालेल्या चारही आरोपींच्या शिक्षेसाठी युक्तिवाद सुरू झाला..
धनंजय चॅटर्जी खटल्याचा हवाला देत फाशीची मागणी केली गेली
पीडितेचे वकील म्हणाले, हा पूर्वनियोजित गुन्हा होता. दुर्मिळातील दुर्मिळ. एक असहाय तरुणी दयेची विनवणी करत असतानाही आरोपींना पाझर फुटला नाही. यामुळे आता तेही दयेस पात्र नाहीत. पोलिसांनीही फाशीची मागणी केली आहे. आरोपींच्या पार्श्वभूमी वा परिस्थितीकडे न बघता त्यांच्यावर दयामाया केली जाऊ नये.
जसे की, कोलकात्यातील धनंजय चॅटर्जी प्रकरणात झाले. धनंजयने 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केली होती. एक दशक तुरुंगात घालवूनही त्याला कोलकात्यातच फासावर लटकवले गेले. त्याची दया याचिका राष्‍ट्रपतींनीही फेटाळली होती.


गृहमंत्र्यांविरुद्धची याचिका खारीज
चौघा आरोपींपैकी मुकेशच्या वकिलांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. यात त्यांनी दोषींना फाशीचीच शिक्षा मिळणार असल्याचे म्हटले होते. न्यायाधीश म्हणाले, कोर्ट साक्षीपुराव्यांच्या आधारेच निकाल देईल. वकिलांनी शिंदेंवर न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने ती अप्रासंगिक असल्याचे सांगत फेटाळून लावली.


कसाबसाठीही असाच युक्तिवाद केला होता
दिल्ली गँगरेपच्या दोषींविरुद्ध वकिलांनी जे युक्तिवाद केले, तसेच युक्तिवाद मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार कसाबची बाजू मांडणाºया वकिलांनीही मांडले होते -
० तो अद्याप तरुण आहे.
० तो गरीब कुटुंबातील आहे.
० तो निरक्षर आहे.
० चांगल्या-वाईटाची समज नसल्याने तो गुन्हेगारी जगतात ढकलला गेला.


शिक्षेपासून वाचण्यासाठी मानवी हक्क, व्होट बँक, गांधीजींचा उल्लेख
पार्श्वभूमीचा हवाला : 19 वर्षांच्या पवन गुप्ताच्या वयाकडे बघून शिक्षा द्यावी. ही घटना पूर्वनियोजित नव्हती तर क्षणभराचा आवेग होता. जाणूनबूजून गुन्हा करण्यात आला नाही. त्यामुळे मृत्युदंड देण्यात येऊ नये. हे आरोपी निरक्षर आहेत.


मानवाधिकारांचे उल्लंघन आहे : ‘कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो. त्यांना तसे बनविण्यात येते आणि त्यांना सुधारताही येते’
गांधीजींचा दाखला : महात्मा गांधी यांनी सांगितले आहे की, ‘आयुष्य ईश्वर देतो आणि तोच त्याला हिरावून घेऊ शकतो.’
व्होट बँकेचे राजकारण आहे : बाटला हाऊस चकमकीतील अतिरेक्यास कोर्ट जन्मठेप सुनावते. मतपेटीच्या राजकारणांतर्गत त्याला सवलत मिळते. जर अतिरेक्यांना जन्मठेप सुनावली जात असेल तर यांना फाशी देण्याबाबत विचार का केला जातोय?
माध्यमे दोषी : कठोर शिक्षेसाठी माध्यमांनी वातावरण निर्मिती करून न्यायालयास बाहेरून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे.
योग्य प्रकारे चौकशी नाही : कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वी गुन्ह्यातील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिकेचा विचार करावा. पोलिसांनी नीट चौकशी केली नाही. (जज बचाव पक्षाच्या वकिलांना : केसवर लक्ष द्या. पोलिसांचे अपयश इत्यादी बाबींवर नाहक युक्तिवाद करू नका.)


‘ती’ गयावया करताना द्रवले नाहीत, त्यांना आता दया का?
- सरकार पक्षाचे वकील दयन कृष्णन


अतिरेक्यांना जन्मठेप, मग यांना फाशीची शिक्षा का?
- नराधम आरोपींचे वकील ए.पी. सिंह