आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली गॅंगरेप: अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेचा निर्णय 25 जुलैपर्यंत लांबणीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत गेल्यावर्षी 16 डिसेंबरच्या रात्री धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी एक असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या 25 जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे. या अल्पवयीन आरोपीवर बलात्कार, हत्या आणि अपहरण केल्याचा आरोप आहे. आज (गुरुवार) त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने त्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला आहे. अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेचा निर्णय सीलबंद पाकिटात बंद करून ठेवण्यात आला असून हे पाकिट 25 जुलैला उघडले जाणार आहे. या प्रकरणावर माध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

तत्पूर्वी 'आपण निर्दोष असून अन्य पाच जणांनी तरुणीवर बलात्कार केला होता', असा दावा अल्पवयीन आरोपीने केला आहे. 'मी बस चालवत होतो. बसमध्ये असलेल्या इतर पाच जणांनी तरुणीवर बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला धावत्या बसमधून बाहेर फेकून दिले होते'; असे त्याने बुधवारी कोर्टात सांग‍ितले आहे.

आरोपी आता सज्ञान झाला असला तरी गुन्हा करतेवेळी तो अल्पवयीन होता. त्यामुळे बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत या आरोपीचा फैसला होणार असल्याचे समजते. आरोपीला दोषी ठरल्यानंतर त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. बालसुधारगृहामध्ये त्याला शिक्षा भोगावी लागेल.

दरम्यान, 16 डिसेंबरला चालत्या बसमध्ये एका पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्रास बेदम मारहाण करून धावत्या बसबाहेर फेकून देण्यात आले होते.

गंभीर अवस्थेत तिला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारांसाठी तिला सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती खालावल्याने तिथेच तिची प्राणज्योत मालवली होती.

याप्रकरणी मुख्य आरोपी राम सिंग, विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश आणि एका अल्पवयीन मुला पोलिसांनी अटक केली होती. मात्र राम सिंग याने गेल्या 11 मार्च रोजी तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.