नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'एक एप्रिलपासून रिलायन्स इंडस्ट्रीज केंद्र सरकारशी संगनमत करुन एक डॉलर किंमतीचा गॅस 8 डॉलरमध्ये विकणार आहे. असे झाले तर, महागाई आकाशाला भिडेल.'
केजरीवाल यांनी आज (मंगळवार) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली, माजी संचालक हायड्रोकार्बन व्ही. के. सिब्बल, रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी लाचलूचपत प्रतिबंधक खात्याला एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
केजरीवाल म्हणाले, ही तक्रार कॅबिनेटमध्ये राहिलेले टी. आर. सुब्रामण्यम, ई.एल. शर्मा, माजी नेव्ही चीफ अॅडमिरल तालिहानी, वकील कामिनी जयसवाल यांनी केली होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजने काही तेल विहिरी घेतल्या आहेत. त्यातून नैसर्गीक वायू काढण्याचा खर्च एका युनिटसाठी एक डॉलर पेक्षाही कमी आहे. हे काम 17 वर्षांच्या कराराने एनटीपीसीला 3.28 या दराने देण्यात आले होते. मात्र, रिलायन्सने काही मंत्र्यांना हाताशी धरुन याची किंमत 4 डॉलर पेक्षा जास्त करुन घेतली. त्यांची ही हाव एवढ्यावरच थांबली नाही तर, त्यांनी तेल विहिरीतून अत्यंत कमी गॅस बाहेर काढला. किमान 80 युनिट गॅस तयार केला गेला पाहिजे होता मात्र, 18 टक्क्यांपेक्षाही कमी गॅस तयार केला गेला.
केजरीवाल म्हणाले, माझ्याकडे आलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे, की एप्रिलपासून गॅसचा दर 18 रुपये प्रति युनिट केला जाणार आहे. असे झाले तर, सीएनजीचे दर वाढतील. ज्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे वीज आणि गरजेच्या वस्तूंचीही भाववाढ होईल. त्यांनी आरोप केला की, नैसर्गिक वायूंचा दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरवला जाईल असे ठरले होते, हे चूकीचे असून त्याच्या निर्मीती खर्चावरती त्याची किंमत ठरली पाहिजे होती.
केजरीवाल म्हणाले, या प्रकरणी पंतप्रधान आणि सर्व मंत्रालयांना पत्र लिहून याची चौकशी होईपर्यंत पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींना स्थगिती देण्याची मागणी केली जाणार आहे.
केजरीवालांच्या या आरोपांवर पेट्रोलियम मंत्री मोईली यांनी, केजरीवाल यांना सरकार चालवण्याचा अनुभव नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, तज्ज्ञांचे मत