आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट गुणपत्रिका प्रकरण: काेठडीत रवानगीनंतरच जितेंद्र ताेमरांचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली आणि केंद्र सरकार यांच्यातील अधिकारांच्या लढाईला मंगळवारी नवे वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी बनावट गुणपत्रिका प्रकरणात दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. काेठडीत रवानगी झाल्यानंतर ताेमर यांनी राजीनामा दिला असून ताे मंजूरही झाला. दरम्यान, केंद्र सरकार दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती तयार करत आहे, असा आरोप ‘आप’ने केला आहे.
तोमर पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. दिल्ली बार कौन्सिलने त्यांच्या विरोधात ११ मे रोजी तक्रार केली होती. तोमर यांनी अवध विद्यापीठातून बी. एस्ससी केले आणि बिहारमधील मुंगेर इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीजमधून एलएलबीची बनावट पदवी मिळवली आहे, असे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशीसाठी दोन पथके संबंधित संस्थांमध्ये पाठवली होती. आरोप खरे आहेत, असे आढळल्यानंतर सोमवारी, ८ जूनला हौज खास पोलिस ठाण्यात फसवणूक आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता.

अटक प्रक्रियेचे पालन नाही
दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल म्हणाले,‘अटकेबाबत योग्य प्रक्रियेचे पालन झाले नाही. मला अटकेची माहितीच देण्यात आली नाही.’ मात्र, दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी म्हणाले, ‘मंत्र्याला अटक करताना काही प्रक्रियांचे पालन आवश्यक असते. या प्रकरणात ते पालन झाले आहे.’
गृह मंत्रालयाने रचला कट
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया म्हणाले, ‘आप सरकारने घोटाळ्यांची फाइल पुन्हा उघडल्यामुळे मोदींच्या सांगण्यावरून गृह मंत्रालयाने हा कट रचला. पण भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही.’ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनऊत म्हणाले, ‘गृह मंत्रालय असे काम करत नाही. कायदा आपले काम करेल.’
अटकेची घाई कशासाठी?
शिसोदिया म्हणाले , ‘पोलिसांनी एखाद्या माफियाप्रमाणे तोमर यांना अटक केली. ते पळून जात होते का? त्यांनी बॉम्बस्फोट केला होता का? अशी कोणती आणीबाणी होती? ’ दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, तक्रार ११ मे रोजी आली होती. आठ जूनला गुन्हा दाखल झाला. कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी एवढा वेळ पुरेसा आहे. त्यामुळे घाई केली असे म्हणणे चूकच आहे.
बातम्या आणखी आहेत...