आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Law Minister Somnath Bharti Beaten Up African Woman Complain Registered

दिल्लीच्या कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी मारहाण केल्याचा आफ्रिकन महिलेची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमली पदार्थ आणि इतर गैरप्रकार होत असल्याच्या नावाखाली आफ्रिकन तरुणांच्या घरावर मध्यरात्री धाड घालून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या विरोधात युगांडाच्या एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. बेताल वक्तव्यामुळे आधीच भारती वादाच्या भोव-यात सापडले होते. आता त्यांच्या राजीनाम्यासाठी चहूबाजूंनी दबाव वाढतो आहे.
भारती यांच्या विरोधातील तक्रारीनंतर आप सरकारवर टीकेची झोड उठली आहे. महिला सुरक्षेच्या नावाखाली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले आणि दुसरीकडे त्यांच्याच सरकारचा कायदामंत्री महिलांवर हात उगारतो या दुटप्पीपणाबद्दल महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. दिल्ली महिला आयोगाने भारती यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. महिला हक्क कार्यकर्त्यांनीही भारती यांनी कायदा हातात घेतल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, भारती यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, कायदामंत्र्यांच्या मदतीला पक्ष धावून आला आहे. कोणताही नागरिक, मंत्री पोलिसांना बेकायदा कारवाई करण्यास सांगू शकतो, असा तात्त्विक मुलामा ‘आप’ने दिला आहे.
पाच आफ्रिकन महिलांचा जबाब : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच आफ्रिकन महिलांचा जबाब नोंदवला. यामध्ये तीन नायजेरियन व दोघी युगांडाच्या महिला आहेत. विनयभंग, वर्णद्वेषी ताशेरे, घराची झाडाझडती आणि मारहाण प्रकरणी कलम 164 नुसार न्यायाधीशासमोर या पाचही जणांचा जबाब नोंदवण्यात आला.
भारतींची काय भानगड?
सोमनाथ भारती 15 जानेवारी रोजी काही लोकांसह खिडकी एक्स्टेंशन भागात गेले होते. या ठिकाणी आफ्रिकन नागरिक अंमली पदार्थ व वेश्यांचे रॅकेट चालवत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी पोलिसांना बोलावून काही घरांवर धाड टाकण्यास सांगितले; परंतु पोलिसांनी त्यास नकार दिला. विनावॉरंट रात्री कारवाई करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुस-या दिवशी पाच आफ्रिकन महिलांनी भारतींसह त्यांच्या समर्थकांविरुद्ध तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता नायब राज्यपालांनीही न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
आफ्रिकन महिलेचा धक्कादायक आरोप
युगांडाच्या एका महिलेने दिलेला जबाब धक्कादायक आहे. तिने न्यायाधीशांसमोर भारती यांना ओळखल्याचा दावा केला. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काही लोक आले होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी आम्हाला मारहाण केली. विनयभंग केला. देश सोडून चालते व्हा, अन्यथा एक-एकाला मारून टाकू, अशी धमकीही दिली, असा जबाब या महिलेने नोंदवला आहे. 15 जानेवारी रोजी ते आले होते. त्यानंतर मी त्यांना टीव्हीवर पाहिले म्हणून भारती यांना ओळखू शकले, असा दावा तिने केला.
भारतींच्या अटकेची शक्यता
1. आतापर्यंत अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल होता. आता आफ्रिकन महिलांच्या जबाबानंतर भारती यांच्याविरुद्धही केस चालेल.
2. पोलिसांनी कलम 451 (बळजबरी घरात घुसणे), 427 (छेडछाड) आणि 506 (धमकी ) आदीप्रकरणी गुन्हा दाखल केला. भारतींविरुद्ध विनयभंगाचीही तक्रार आहे.
3. दिल्ली पोलिस भारती यांना अटक करू शकते; परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरच पोलिस कारवाई करण्याची शक्यता आहे.
आप आमदारांची निदर्शने
कायदामंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी आपचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी केली आहे. भारती यांच्या हकालपट्टीसाठी त्यांनी समर्थकांसमवेत दिल्ली सचिवालयाबाहेर निदर्शनेही केली.
किरण बेदीही भडकल्या
निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी किरण बेदी यांनी भारती यांच्याविरुद्ध कारवाई न केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. पोलिसांविरुद्ध चौकशी न करताच कारवाई करण्यात आली; परंतु भारती मोकळेच आहेत, असा आरोप त्यांनी केला.