नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्यासारखा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ मुख्यमंत्री होणार म्हणून काही अधिका-यांनी ठरावीक व्यवहाराच्या फायली फाडून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा पर्दाफाश केला.
केजरीवाल यांच्या धास्तीने भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर येण्यापूर्वीच ती निपटून काढण्यासाठी अधिकारी फायली फाडून टाकत असल्याचे स्टिंगमध्ये दिसून आले. दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री अरविंदरसिंग लवली यांच्या कार्यालयात त्यांच्या माजी ओएसडी अनेक संशयित व्यवहारांच्या फायली फाडल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय, दिल्ली जल प्राधिकरणातही असेच मोठे आर्थिक घोटाळे झाल्याची चर्चा असून या भ्रष्ट अधिका-यांना कोणत्याही परिस्थितीत अभय दिले जाणार नाही, अशी ग्वाही केजरीवाल यांनी शुक्रवारी दिली. या फायलींच्या सत्यप्रती ‘आप’कडे असल्याचा दावा भावी कॅबिनेट मंत्र मनीष सिसोदिया यांनी केला आहे.