आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल्ली पोलिसांची यंत्रणेशी बांधिलकी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली पोलिसाचे यंत्रणेशी उत्तरदायित्व आहे, व्यक्तीशी नाही, असे मत दिल्ली पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केजरीवालांसोबतच्या बैठकीनंतर व्यक्त केले. आम्ही सरकारला आणि त्यानंतर संसदेला उत्तरदायी आहोत, असेही ते म्हणाले. केजरीवाल यांनी पोलिसांच्या वापराबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबद्दल एका कॉन्स्टेबलने मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार केली आहे. यावर केजरीवाल यांनी वापरलेले शब्द अस्वीकारार्ह आहेत, मात्र गुन्हा अदखलपात्र असल्याचे बस्सी यांनी सांगितले. त्याआधी दिल्लीतील कायदा, सुव्यवस्था आणि उत्तरदायित्वावरून केंद्र व राज्य सरकारमधील ताणाताणीच्या पार्श्वभूमीवर बस्सी यांनी सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उचलत असलेल्या पावलांची माहिती केजरीवाल यांना दिली. आनंद पर्वत भागातील १९ वर्षीय तरुणीच्या हत्येनंतर केजरीवाल यांनी बस्सी यांना आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने बस्सी यांच्याकडे महिलांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणांची प्रलंबित यादी, त्यांच्या खटल्यांची स्थिती आणि तक्रारीनंतरही बदली न झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागितली होती. बस्सी यांच्याकडे पदाेन्नती न मिळालेले बीट कॉन्स्टेबल आणि निरीक्षकांची यादीही मागण्यात आली. केजरीवाल यांच्यासोबत बैठकीच्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल नजीब जंग यांनी बस्सी यांना भेटण्यास बोलावले होते.
अनेक मुद्द्यांवरून वाद
आम आदमी पार्टीने अापल्या दोन आमदारांच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांविरुद्ध आघाडी उघडली. दिल्ली पोलिस आपल्याविरुद्ध भेदभावपूर्ण पद्धतीने वागत असल्याचा त्यांचा आरोप आहे. आमदारांना राजकीय दबावातून त्रास दिला जात आहे. पोलिस दल राज्याच्या अखत्यारित देण्याच्या मुद्द्यावर बस्सी यांनी तशी आवश्यकता नसल्याचे सांगितले.
स्थगितीस नकार
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांची स्तुती आणि आपचा गौरव वाढवणाऱ्या जाहिरातीवर स्थगिती आणण्यास नकार दिला. सरकारी जाहिरातीच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत स्थापन तीनसदस्यीय समितीच्या शिफारशीवर केंद्राने कोणती पावले उचलली हे जाणून घेतल्याशिवाय याचिका मंजूर केली जाणार नसल्याचे न्या. व्ही. पी. वैश्य यांनी सांगितले. कोर्टाने केंद्राला नोटीस पाठवली असून पुढील सुनावणी ३ ऑगस्टला होईल.
बातम्या आणखी आहेत...