नवी दिल्ली - दिल्ली पोलिस आयुक्त बीएस बस्सी केंद्रीय माहिती आयुक्त पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वाद आणि पटियाला न्यायालयातील मारहाणीच्या प्रकरणामुळे त्यांचे यादीतून नाव वगळण्यात आले आहे.
वादग्रस्त घटना योग्यप्रकारे हाताळण्यात त्यांना अपयश आले. त्यावरून राजकीय पक्षांनी टीका केली होती. काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यांना लक्ष्य केले होते. त्यातून सरकारवर दबाव होता. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीने त्यांचे नाव यादीतून वगळले. माहिती आयोगातील रिक्त पदे भरण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला सहा आठवड्यांचा अवधी दिला आहे. समितीने शुक्रवारी सकाळी बैठक घेतली. बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे देखील उपस्थित होते.