नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना आम आदमी पक्ष (
आप) अडचणीत सापडला आहे. दिल्लीतील एका गोदामातून पोलिसांनी रविवारी 8000 दारुच्या बाटल्या जप्त केल्या होती. या बाटल्या 'आप'चे उमेदवार नरेश बालयान यांनी मागविल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिली.
नरेश बालयान यांनी या प्रकरणात दारू माफियाची मदत घेतल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. बालयान हे दक्षिण दिल्ली नगर पालिकेचे नगरसेवक आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 'आप'चे उमेदवार नरेश बालयान यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी 8000 दारुच्या बाटल्या मागवल्या होत्या. मात्र, रविवारी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एका गोदामातून सर्व बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. सहआयुक्त रवींद्र यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. बालयान यांनी चौकशी अधिकार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. मात्र, यासाठी बालयान यांनी 7 फेब्रुवारी अर्थात मतदानाच्या तारखेपर्यंत मुदत मागितली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी 31 जानेवारीला उत्तम नगरातील एका गोदामात छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी 8352 दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. जप्त करण्यात आलेली दारु विक्रीस दिल्लीत निर्बंध घालण्यात आले असतानाही नरेश बालयान यांनी ही दारु मागवल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अबकारी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल केला आहे.