आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पाच वर्षांच्या निरागस बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचाराविरुद्ध सबंध देश पुन्हा एकदा पेटून उठला आणि रस्त्यावर आला. 16 डिसेंबरला बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारांनंतर जनतेच्या भावनेचा असाच कडेलोट झाला होता. शनिवारी काश्मीरपासून केरळपर्यंत लोकांनी निदर्शने केली. विरोधाचे प्रमुख केंद्र दिल्ली होते. पोलिस मुख्यालय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थाने, कार्यालयांसमोर लोकांनी संतप्त निदर्शने केली. बालिकेला न्याय मिळवून द्यावा आणि दिल्ली पोलिस आयुक्त नीरजकुमार यांना बडतर्फ करावे, अशा मागण्या निदर्शकांनी केल्या.
दरम्यान, दिवसभर लोकांच्या संतापाचा उद्रेक पाहून सायंकाळी सरकारला जाग आली. गृहमंत्री शिंदे यांनी तातडीने पोलिस आयुक्त नीरजकुमार यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होऊ शकते. सोनिया गांधी यांनीही ‘एम्स’मध्ये जाऊन पीडित बालिकेची विचारपूस केली. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला. भाजप नेत्या नजमा हेपतुल्ला यांनी तर बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला गोळ्या घालाव्यात, अशी भावना व्यक्त केली. सुषमा स्वराज यांनीही कायद्यात तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करत या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन केले.
वाटते, त्याला गोळी घालावी
‘त्या नराधमाला गोळी घालावी वाटते. आता कुठे आहेत मानवाधिकारवाले आणि मुलींना समज देणारे? त्या बिचा-या चिमुरडीने असे काय भडक कपडे घातले होते?’
नजमा हेपतुल्ला, भाजप नेत्या
नराधमाला फाशी द्या
‘मुलींवर अत्याचार करणा-यांना फासावर लटकावण्यासाठी कायद्यात तत्काळ दुरुस्ती करा. यासाठी कालमर्यादा निश्चित करा. यामुळे नराधमांना धाक बसेल.’
सुषमा स्वराज, भाजप नेत्या
सर्वांसाठी लाजिरवाणी बाब
‘केवळ कडक वक्तव्ये आणि कठोर कायद्याने काहीही होणार नाही. दोषींविरुद्ध कठोर कारवाईच व्हायला हवी. अशा घटना सरकार आणि सर्वांसाठीच लाजिरवाण्या आहेत.’
सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा
पुन्हा एकदा ‘डिसेंबर’
० पोलिस मुख्यालयावर महिलांचा मोर्चा. पोलिसांना बांगड्यांचा आहेर आणि जाहीर लाच म्हणून नोटा दिल्या.
० काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थाने व कार्यालयांसमोर निदर्शने.
० शुक्रवारी तरुणीवर हात उचलणा-या एसीपीला अटक करावी व गुन्हा दाखल करण्याची मागणी.
० ‘एम्स’समोर दिवसभर लोकांची गर्दी. पीडित बालिकेच्या प्रकृतीची लोकांनी केली चौकशी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.