आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीसाठी वसतिगृहाबाहेर जाण्यास विद्यार्थिनींवर बंदी, दिल्ली विद्यापीठातील वस्तिगृहाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठाच्या मुलींच्या दोन वसतिगृहांनी होळीसाठी विद्यार्थिनींना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. हे पाऊल म्हणजे ‘अहेतुक’ आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.  

दिल्ली विद्यापीठाच्या महिलांसाठीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाने (आयएसएचडब्ल्यू) यासंदर्भात जारी केलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, ‘विद्यार्थिनींचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि महिला अतिथींना १२ मार्चला रात्री नऊ ते १३ मार्चला संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत वसतिगृहाबाहेर जाण्याची किंवा परिसरात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. १२ मार्चला विलंब प्रवेशाची मंजुरी मिळणार नाही. ज्यांना होळी खेळायची असेल त्यांनी वसतिगृह परिसरातील निवासी ब्लॉकबाहेर जावे.’  

अशीच नोटीस मेघदूत वसतिगृहानेही काढली अाहे. तीत म्हटले आहे की, ‘वसतिगृहाचे मुख्य प्रवेशद्वार १३ मार्चला सकाळी ६ ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत बंद राहील. ठंडाईच्या रूपात कुठल्याही अमली पदार्थाचे सेवन वसतिगृहात राहणाऱ्यांना करता येणार नाही.’ १२ मार्चला रात्री उशिरा वसतिगृहात परतू नये, असा सल्लाही वसतिगृहाने विद्यार्थिनींना दिला आहे.  

‘महिलांवर कारण नसताना बंधने लादत आहेत’
मुलींच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘पिंजरा तोड’ या विद्यार्थ्यांच्या गटाने या आदेशांना विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘लैंगिक हिंसाचारात झालेली वाढ आणि होळीच्या वेळी रस्त्यांवर महिलांचा होणारा छळ या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याऐवजी महिलांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी डांबले जात आहे. त्यांच्या फिरण्यावर अहेतुक बंधने लादली जात आहेत.’   केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर पडू देऊ नये, या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्याच्या निषेधार्थ ‘पिंजरा तोड’ या गटाने मनेका गांधी यांच्याविरोधात त्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती.

होळी साजरी न करण्याचा राजनाथसिंह यांचा निर्णय
नवी दिल्ली- छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) १२ जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होळी साजरी न करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घेतला आहे. जवानांच्या मृत्यूचे दु:ख झाल्याने राजनाथसिंह यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. सिंह यांनी शनिवारी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती. या हल्ल्यातील जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले होते.
बातम्या आणखी आहेत...