आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवयानी खोब्रागडे माध्यमांशी बोलल्यामुळे परराष्ट्र मंत्रालय नाराज, कामावरुन हटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना प्रसारमाध्यमांसोबत विना परवानगी बोलल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने संचालक पदावरुन काढून कायम प्रतिक्षा यादीत (कम्पलसरी वेटिंग) ठेवले आहे. यामुळे त्या सेवेत तर राहातील, मात्र त्यांच्याकडे कोणताही पदभार नसणार.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकेत व्हिसामध्ये गैरप्रकार व मोलकरणीला कमी वेतन दिल्याचे आरोप देवयानी यांच्यावर ठेवण्यात आले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम झाला होता. देवयाणी गेल्यावर्षी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत होत्या.

काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या सर्व प्रकरणावर भाष्य केले होते. यावर परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेत खोब्रागडे यांच्यावर कारवाई केली आहे. प्रसारमाध्यमामध्ये असे वक्तव्य करण्याआधी त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली आहे.
1999 बॅचच्या आयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना व्हिसामध्ये गैरप्रकार व मोलकरणीला कमी वेतन देण्याच्या आरोपात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेत अटक झाली होती. अडीच लाख डॉलरच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली होती. राजनयिक अधिकारी असताना अटट्ल गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्याशी अमेरिकेतील पोलिस वागल्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधात कडवटपणा आला होता. त्यानंतर त्यांना पूर्ण राजनयिक अधिकार मिळाल्यानंतर त्या मायदेशी परतल्या होत्या.
जानेवारीमध्ये भारतात परतल्यानंतर देवयानी यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात डायरेक्टर दर्जाचे पद देण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, देवयानी यांनी त्यांच्या मुलींचे अमेरिकन पासपोर्ट असल्याचे जाहीर केले नव्हते, यामुळेही परराष्ट्र मंत्रालय त्यांच्यावर नाराज होते. यामुळे देखील त्यांच्यावर कारवाई झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या देवयानी खोब्रागडे