आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhangar Community Agitation In Delhi And Maharashtra

आदिवासी नेत्यांचा आरोप, धनगर समाजाचे आंदोलन राजकीय खेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धनगर समाजातील लोकांनी राज्यात केलेले आंदोलन ही केवळ राजकीय खेळी असून त्यांना कदापिही अनुसूचित जमातीमध्ये येऊ देणार नाही. यासंदर्भात आम्ही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना वस्तुस्थिती सांगितली असल्याची माहिती आदिवासी मंत्री मधुकर पिचड, सामाजिक न्याय मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी येथे दिली.
महाराष्ट्रात धनगर समाजातील लोकांनी सामान्य जनतेला वेठीस धरले असून त्यांचे आंदोलन हे आदिवासींवर अन्याय करणारे असल्याची माहिती आदिवासी नेत्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तत्पूर्वी वरील मंत्र्यांसह राज्यमंत्री पद्माकर वळवी, राजेंद्र गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार चिंतामण वनगांसह 18 आदिवासी आमदारांनी सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी दोन्ही बाजू पडताळून निर्णय घेऊ असे सांगितले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नये यासाठी माझ्यावर सतत आरोप करण्यात येत आहे. परंतु घटनेत ज्या बाबी नोंदविल्या आहेत त्या पाहाव्यात. धनगरांना भटक्या विमुक्त जमातीमधून साडेतीन टक्के आरक्षण मिळत असताना ते आदिवासींच्या आरक्षणावर डोळा ठेवून असल्याची टीका त्यांनी केली.
आदिवासींना वंचित ठेवण्याचा डाव : प्रा. वसंत पुरके यांनी बिहार, ओडिशा, झारखंड या राज्यांत धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये येतो. मात्र, महाराष्ट्रातील धनगर या वर्गवारीतून आरक्षण मागत नाहीत. कारण अनुसूचित जातीमधील लोक शिकले आहेत, त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याचे धैर्य या समाजातील लोकांमध्ये नाही. मात्र, आदिवासी अशिक्षित असून त्यांच्या वर्गवारीत आल्यास खर्‍या आदिवासींना लाभापासून वंचित ठेवता येईल असा डाव असल्याचे पुरके यांनी सांगितले.
तीव्र विरोध कायम राहणार
अॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, आम्ही मतांसाठी मूल्यांचा बळी देणार नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावू, परंतु आदिवासींच्या आरक्षणाला धक्का बसू देणार नाही. राज्यमंत्री पद्माकर वळवी यांनी धनगर समाजातील लोक आदिवासींच्या आरक्षणावर डोळा ठेवून असेल तर ते अशक्य आहे. आम्ही राज्यभर रस्त्यावर येऊ.
आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. धनगरांचे आंदोलन हा केवळ राजकीय स्वार्थासाठी घातलेला गोंधळ असून आधिच महाराष्ट्रात एक लाख बोगस आदिवासींनी आदिवासींच्या कोट्यातून नोकर्‍या मिळविल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलकांनी बस जाळली, दगडफेक
नंदुरबार - खांडबारा येथील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्याला जाणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला दोन हजार आदिवासी आंदोलकांच्या प्रक्षोभास सामोरे जावे लागले. नवापूर चौफुलीवर उपमुख्यमंत्र्यांची गाडी 9 मिनिटे अडवण्यात आली. आंदोलकांच्या गराड्यातून उपमुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर काढण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने अलीकडे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी दोन हजार आदिवासी आंदोलक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते. आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ भरत वळवी, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावित, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, आमशा पाडवी यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला.
आदिवासी कार्यकर्ते, आंदोलकांनी हाताची साखळी तयार केली. उपमुख्यमंत्र्याचे वाहन अडविले. वाहनात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,पक्ष निरिक्षक किरण शिंदे व समाजवादी पार्टीचे आमदार शरद गावित हेही होते. आंदोलक आक्रमक झाल्याने नेत्यांनी खाली उतरून त्यांच्याशी चर्चा केली. दहा मिनिटानंतर पोलिसांनी गाड्यांना रस्ता काढून दिला.
दरम्यान,या आंदोलनाआधी अर्धा ते पाऊण तास आधी हॉटेल गौरव पॅलेस जवळ 200 आदिवासी आंदोलकांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी फेकलेली बाटली लागून पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल चौधरी जखमी झाले.