नवी दिल्ली- राजधानीतील पोलिस एका अनोख्या 'बॅंक रॉबरी'च्या चौकशीत व्यग्र आहेत. शहरातील एका मोठ्या रुग्णालयातील 'स्पर्म बॅंक'मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लाजपतनगर पोलिस चौकशी करत आहेत. रूग्णालय प्रशासनने चोरीस गेलेल्या वस्तुची यादी पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूलचंद रुग्णालयातील 'आयव्हीएफ लॅब'मध्ये चोरी झाल्याचे 2 ऑगस्टला उघडकीस आले. चोरट्यांनी लॅबमधील अन्य वस्तुसह स्पर्म आणि बिजाणू देखील लांबवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून स्पेशल सेलकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील एका अन्य स्पर्म बॅंकेवर पोलिसांचा संशय आहे.
एका इंग्रजी भाषिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शहरातील मूलचंद हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन ऑगस्टला सकाळी नऊ वाजता आयव्हीएफ लॅबमध्ये ही चोरी झाल्याचे लक्षात आले टेक्नीशियन परितोष सरकारने लॅब उघडली होती. लॅबमधील अनेक वस्तु गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले.
रुग्णालयाचे एचआर मॅनेजर सुरोश्री बॅनर्जी यांनी सांगितले की, लॅबमध्ये स्पर्म हॅंडलिंग सोल्यूशनच्या आठ बाटल्या, स्ट्रिपर्स, कल्चर ऑईल आणि फर्टिलाइझेशनशी संबंधित औषधींची चोरी झाली आहे. मात्र, कोणतेही ह्यूमन बायोलॉजिकल प्रॉडक्ट चोरीस गेले नाहीत. एका दिवसापूर्वी टेक्नीशियन अमित याने डिपार्टमेंट बंद केले होते.
सीसीटीव्ही फूटेजची मदत...
चोरीप्रकरणी पोलिस रुग्णालयातील डॉक्टर तसेच अन्य कर्मचार्यांचीही चौकशी करत आहेत. चोरीला गेलेल्या औषधी कुठे वापरल्या जाऊ शकतात काय, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. रुग्णालयातील एखाद्याने चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.