आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disappointed BJP Leaders Responsible Lost Delhi Polls

नाराज नेत्यांमुळेच भाजपचा सफाया, ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील दारुण पराभवाच्या कारणांविषयी भाजपमध्ये चिंतन सुरू असले, तरी नेतृत्वाच्या हेकेखोर धोरणामुळे अनेक नेते दुखावले गेले होते. अनेक नाराज नेत्यांनी प्रचाराचा केवळ देखावा केला, अशी माहिती एका केंद्रीय मंत्र्याने 'दिव्य मराठी'सोबत बोलताना दिली.

आपली’ लाट असल्यामुळे दिल्लीत भाजप सहजतेने विजय मिळवू शकतो, असा समज स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी करून घेतला होता. दिल्लीचा चांगला अभ्यास असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांना रणनीतीमधून वगळण्यात आले. याआधी या दोन्ही नेत्यांच्या सक्रिय सहभागानेच दिल्लीची निवडणूक लढवण्यात आली होती. शहा हे नेत्यांना सौहार्दपूर्ण वागणूक देत नसल्यामुळे आणि किरण बेदी यांच्याकडे नेतृत्व सोपवल्यामुळे नेत्यांमध्ये होत असलेली धुसफुस कार्यकर्त्यांनी हेरली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला डिसेंबर २०१३ मध्ये मिळालेल्या मतांएवढीच ३३ टक्के मते पडली असली, तरी या वेळी अडीच लाख नव्या मतदारांची भर पडली होती. या वेळी दोन टक्के जास्त मतदान झाले; परंतु ही सर्व गठ्ठा मते आम आदमी पार्टीच्या वाट्याला गेली होती. मोदींचा रथ अडवण्यासाठी काँग्रेसनेही आम आदमी पार्टीला अप्रत्यक्ष सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसले.

केंद्रीय मंत्र्यांना सक्तीने प्रचारात उतरवणे, ५०-६० लोकांपुढे त्यांच्या सभा घेणे हे दिल्लीत हास्यास्पद होत असल्याची तक्रार एका राज्यमंत्र्याने केली. भाजपचे खासदार दिल्लीच्या रस्त्यांवरून अभिवादन करत फ‍िरत होते, परंतु हा नेता कोण आहे? हा प्रश्न मतदारांपुढे होता. या चिंतनामुळे भाजपमध्ये मोदी-शहा विरुद्ध अन्य ज्येष्ठ नेते असा वाद उफाळण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी वेळीच सावध होऊन सर्वांना सन्मान दिल्यास भाजपला दहा वर्षे देशावर राज्य करण्यास कोणीच अडवू शकत नसल्याचे या मंत्र्याने सांगितले.