आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुश्किल वक्त, कमांडो सख्त ! जवानांनी आबालवृद्धांची मने जिंकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौचर (उत्तराखंड)- नैसर्गिक संकटासमोर गुडघे न टेकवता प्राण वाचवण्याचे अथकपणे मिशन राबवणार्‍या आयटीबीपी जवानांनी पूरग्रस्त आबालवृद्धांची मने जिंकली. अडकलेल्या नागरिकांना मृत्यूच्या दरीतून सुखरूप बाहेर काढण्याचा त्यांचा पराक्रम अजूनही सुरूच आहे. एकीकडे मदत कार्य युद्धपातळीवर असताना बद्रीनाथ भागात नागरिकांची अजूनही ससेहोलपट सुरू आहे. उत्तराखंडातून उत्तर प्रदेशात वाहत आलेल्या मृतदेहांची संख्या गुरुवारी 16 वर पोहोचली. पुराचा फटका शेतीला बसला असून खरिपातील बटाटा पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, केदारनाथ मंदिरात शनिवारपासून पूजाविधी सुरू होणार आहे.

पथक पाहताच चेहर्‍यावर आनंद

आयटीबीपीचे जवान उत्तराखंडमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून कार्यरत आहे. अहोरात्र जवान नागरिकांची सुटका करण्याच्या कामास लागले आहेत. अनेक दिवसांपासून उपाशी असणार्‍या आणि दुर्गम भागात अडकून पडलेल्या ठिकाणी आयटीबीपी जवानांची टीम पाहताच नागरिक उत्स्फूर्तपणे आनंदाने ओरडत. गौरीकुंड भागात जवानांना असा अनुभव वारंवार आला.

प्रकृतीचीही पर्वा नाही

नागरिकांना संकटातून सोडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आयटीबीपीचा प्रत्येक जवान दिवस-रात्र याच कामात गुंतलेला आहे. हे करताना कोणाची प्रकृती बिघडलेली आहे किंवा कोण सुटका करण्यासाठी धावतोय याला आमच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे ही मोहीम आम्ही जरूर फत्ते करू, असा विश्वास उपकमांडंट ए. के. सचन यांनी व्यक्त केला. केदारनाथ भागात मदतकार्य करताना मला अनेक ठिकाणी मृतदेह पडलेले दिसत होते, तरीही आमचे कार्य सुरू होते. शेवटपर्यंत ते चालू राहील. अंगात ताप असताना मी एका वृद्ध व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी हलवले, असा अनुभव रत्नेश बोराने सांगितले. बोरा गेल्या आठ दिवसांपासून केदारनाथमध्ये तैनात आहेत.

बटाट्याची नापिकी
उत्तराखंडचे मुख्य पीक असलेल्या खरिपातील बटाट्याच्या उत्पादनास फटका बसणार आहे. सध्या राज्यात 20 ते 30 हजार हेक्टर एवढा पेरा झाला आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या 10 टक्के बटाटा राज्यात उत्पादित केला जातो. परंतु उत्पादन कमी झाल्याचा परिणाम किमतीवर होणार नाही.

बद्रीनाथ परिसरातील मोहिमेत अडथळा

गुप्तकाशी - खराब हवामानामुळे बद्रीनाथ परिसरातील हवाई मदतकार्यात अडथळे येत असल्याने ते गुरुवारी थांबवण्यात आले. त्याचा फटका केदारनाथ भागातील अंत्यसंस्काराला बसला. मृतदेहावर अंत्यसंस्काराचे काम काही काळासाठी थांबले आहे. हवाईमार्गे करण्यात येणार्‍या मदतीमध्ये अडथळा आला आहे.