आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discussion On Lalit Gate In Loksbha Congress Aggressive

मोदींनी किती पैसे दिले?-राहुल; क्वात्रोचीकडून किती घेतले?-सुषमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त आणि मनी लाँडरिंगचा आरोपी ललित मोदीला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आडून बसलेली काँग्रेस बुधवारी लोकसभेत चर्चेला राजी झाली. काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव स्वीकारून या प्रकरणी घेतलेल्या चर्चेत विरोधी आणि सत्ताधारी पक्षाने एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. ‘सुषमांच्या कुटुंबातील सदस्य ललित मोदीची कायदेशीर प्रकरणे हाताळतात. त्या बदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळते. ललित मोदींकडून तुमच्या कुटुंबाला किती पैसे मिळाले, हे जाहीर करा,’ असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. त्यावर ‘क्वात्रोचीकडून किती पैसे मिळाले होते, हे राहुल गांधींनी आपल्या आईला विचारायला हवे,’ असे सुषमा म्हणाल्या.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या विषयावर चर्चेसाठी अडीच तासांचा वेळ दिला होता. या वेळी सुषमा जुन्याच ढंगात दिसून आल्या. त्यांनी गांधी कुटुंब आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या आत्मकथनाचा हवाला देत सुषमा म्हणाल्या की, काँग्रेसने वॉरेन अँडरसन आणि क्वात्रोचीला पळून जाण्याची संधी दिली. राहुल गांधींना सुट्यांवर जाण्याची मोठी हौस आहे. या वेळी जेव्हा सुटीवर जाल तेव्हा आपल्या कुटुंबाचा इतिहास वाचा. परत आल्यावर क्वात्रोची प्रकरणात आपण किती पैसे खाल्ले होते? डॅडींनी (राजीव गांधी) अँडरसनला का सोडवले? हे आपल्या मॉमला (सोनिया गांधी) विचारा, असे माझे त्यांना सांगणे आहे. राजीव गांधी यांच्या मित्राचा मुलगा आदिल शहरयार ३५ वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात होता. त्याच्या सुटकेसाठी राजीव गांधींनी अमेरिकेशी अँडरसनचा सौदा केला होता, असा आरोप त्यांनी केला.

सुषमा म्हणाल्या की, पासपोर्ट प्रकरणात माझे पती ललित मोदीचे वकील नव्हते आणि माझी मुलगी त्यांची नवव्या क्रमांकाची वकील होती. माझी मुलगी आणि पतीने ललित मोदीकडून एक रुपयाही घेतला नाही. हितसंबंध काय असतात हे विरोधी पक्षाला मी सांगू इच्छिते. चिदंबरम यांच्या पत्नीला त्यांच्याच मंत्रालयाच्या वतीने वकील करण्यात आले होते. स्वत: चिदंबरम यांनी सभागृहात ते मान्यही केले होते. ललित मोदी प्रकरणात काँग्रेसच गुन्हेगार आहे. चार वर्षे त्याची फाइल इंचभरही पुढे सरकली नाही. ईडीने कारवाई केली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अपील झाले नाही. काँग्रेसच्या चुकांमुळेच ललित मोदी लंडनमध्ये राहत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आजवर २३० कोटींचा चुराडा :
ललित मोदीप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज १६ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे.
- संसदेच्या कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला सुमारे अडीच लाख रुपये खर्च होतात.
-प्रत्येक तासाला १.५ कोटी रुपये खर्च.
-संसदेच्या एक दिवसाच्या कामकाजावर १४.४ कोटी रुपये खर्च.
-साधारणपणे लोकसभेत सहा तास, तर राज्यसभेत पाच तास कामकाज होणे अपेक्षित अाहे.
-आजपर्यंत विरोधी पक्षाशिवाय लोकसभेत ४१ %, तर राज्यसभेत केवळ ८ % कामकाज झाले.
-ते पाहता गेल्या १६ दिवसांत २३० कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे.

कोण आहे आदिल शहरयार?
सुषमा स्वराज यांनी ज्या आदिल शहरयार याच्याशी राजीव गांधींचा संबंध जोडला त्याच्यावर अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये बॉम्बस्फोट, फसवणूक आणि बेकायदेशीर व्यवहार केल्याचे आरोप होते. १५ ऑगस्ट १९८५ रोजी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी त्याच्या माफीनाम्यावर ११ जून १९८५ रोजी स्वाक्षरी केल्यावर आदिलची सुटका करण्यात आली होती.
गुपचूप कल्याण हा कुठला मानवतावाद
सुषमा स्वराज यांच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी मैदानात उतरले. गुपचूप एखाद्याच्या भल्याचे काम करणाऱ्या तुम्ही पहिल्याच मानवतावादी आहात, असा जोरदार हल्ला त्यांनी सुषमांवर केला. राहुलनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले. सभागृहात येऊन आमच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत पंतप्रधानांमध्ये नाही, असे राहुल म्हणाले. महात्मा गांधींच्या तीन माकडांचे उदाहरण देत राहुल म्हणाले की, मोदीजींची तीन नवीन माकडे आहेत. खरे पाहू नका. खरे बोलू नका. खरे ऐकू नका, असे त्यांचे म्हणणे आहे.

खरगेंनी उपस्थित केले सात प्रश्न
लोकसभेत काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारला सात प्रश्न विचारले. ते असे :

१. ललित मोदीला लंडनच्या भारतीय उच्चायुक्तांकडे अर्ज करायला का सांगितले नाही?
२. सरकार या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जारी का करत नाही?
३. ललित मोदी भारताऐवजी ब्रिटनच्या पासपोर्टवर पोर्तुगालला का गेला?
४. सरकारने मोदीला भारतात परतायला का सांगितले नाही?
५. सरकारने ललित मोदीच्या पासपोर्टला सर्वोच्च न्यायालयात आव्हान का दिले नाही?
६. ललित मोदीबाबत सरकारने ब्रिटनकडे आक्षेप का नोंदवला नाही?
७. ललित मोदीने भारतात आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. सरकार त्याला सुरक्षा का देऊ शकत नाही?

साेनिया भडकल्या : या चर्चेत खरगे बोलत असतानाच ‘ललित मोदीकडून राहुलच्या मावशींना किती पैसे मिळाले होते?’ अशी टिप्पणी अलिगडचे भाजप खासदार सतीश गौतम यांनी केली. ते ऐकताच सोनिया भडकल्या. त्यांच्यासह काँग्रेस खासदार वेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राहुल एक्स्पर्ट विदाऊट नॉलेज : जेटलींचा खोचक टोला
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या वतीने चर्चेला उत्तर दिले. राहुल हे एक्सपर्ट विदाऊट नॉलेज आहेत, असा खोचक टोला मारत ते म्हणाले की, काँग्रेसच्या दाव्यात दम नाही. मोदीचे प्रकरण २००९-१० चे आहे. त्याच्याविरुद्ध फेमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यात अटकेची तरतूद नाही. फेमामध्ये फक्त दंडाची तरतूद आहे. काँग्रेससाठी हे प्रकरण ‘खोदा पहाड, निकली चुहिया’ असेच आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ब्रिटनला तीन पत्रे लिहिली होती. यूपीएला एवढेच गांभीर्य होते तर लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस का काढली? रेड कॉर्नर नोटीस का नाही काढली? जेटलींच्या उत्तरानंतर काँग्रेससह जदयू, राजद आणि डाव्या पक्षांनी सभात्याग केला.

भावुक अडवाणींनी थोपटली सुषमांची पाठ : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सत्ताधारी बाकावर सुषमांच्या बाजूलाच बसले होते. सुषमा बोलत असताना अनेकदा ते भावुक झाले. डोळे पुसताना दिसले. सुषमांचे भाषण संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.