आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशक्त, आजारी माणसांच्या साहाय्याने देशात हल्ल्याचा धोका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्येष्ठ नागरिक, अशक्त व आजारी माणूस असल्याचे भासवून सुरक्षा यंत्रणेची सहानुभूती मिळवून दहशतवादी संघटना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखादा भयंकर घातपाती हल्ला घडवू शकतात. गुप्तचर यंत्रणेकडून तसा इशारा देण्यात आल्याने दिल्लीसह इतर आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या अधिकार्‍यांना विशेष दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.

सुरक्षा अधिकार्‍यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून प्रवाशांची तपासणी करताना महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी प्रवाशांसोबत सहकार्याची भूमिका ठेवा, परंतु तपासणीत कोणतीही कसूर सोडू नये. अशा व्यक्तींबाबत विशेष सावध असावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये बीजिंग विमानतळावर व्हीलचेअरवर आलेल्या एका प्रवाशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्या पार्श्वभूमीवर इतर विमानतळांवरही अशाच प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. बीजिंग विमानतळावर 20 जुलै रोजी व्हीलचेअरवरून येत जिंगहोंगसिंग या 34 वर्षीय युवकाने एका मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होते. भारतातदेखील अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, असे सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे. विमानतळावर तैनात असलेल्या तपास अधिकार्‍यांना त्यासंदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. आजारी, अशक्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना व्हीलचेअरवर बसवून आणून त्यांच्या नावाखाली सुरक्षा यंत्रणेची दिशाभूल केली जाऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तींची तपासणी करताना खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.


चालक दलाच्या सदस्यांनाही सतर्कतेचे आदेश
सुरक्षा एजन्सीजनी सर्व विमानतळांवर विमान कंपन्यांना सतर्क राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. सुरक्षा अधिकार्‍यांच्या माहितीनुसार चेक इन स्टाफला प्रवाशांच्या हालचाली, हावभाव, त्यांचे वर्तन यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. आजारी प्रवासी किंवा कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करून विमानतळांवर आलेल्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करू नये, त्यांना काळजीपूर्वक तपासावे. काही संशयास्पद आढळल्यास सीआयएसएफला त्वरित कळवावे, विमानात सामान चढवताना सर्व बॅगांना सिक्युरिटी टॅग आहे किंवा नाही हे तपासावे, असे सांगण्यात आले आहे.