आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ भारत: यशस्वी अभियान की नुसतीच आरंभशूरता? (दिव्य मराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दसऱ्याच्या सुटीनंतर आज परत कॉलेज सुरू झालं. गेटवर पाऊल ठेवल्या ठेवल्या बाजूलाच भरपूर कचरा पिशव्यांमध्ये भरून ठेवला होता. 2 ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाचाच हा परिणाम आहे हे पाहताक्षणीच कळालं. थोडं पुढे गेल्यानंतर अजून एका ठिकाणी असाच भरपूर कचरा साठवून व्यवस्थित एका बाजूला ठेवला होता. इतके दिवस होऊनही हा कचरा इथेच कसा हा विचार माझ्या मनात आला. पण वर्गात जायची घाई म्हणून मी हा विचार बाजूला ठेऊन लवकर तासाला गेले. पुन्हा दुपारी सगळं झाल्यानंतर वर्गातली सगळी मंडळी कॉलेजच्या आवारात गप्पा मारत बसली होती. तसं आमच्या कॉलेजचा कॅम्पस खुप काही मोठा नाहीये; त्यामुळे आम्ही जिथे बसलो होतो तिथून थोड्या लांब अंतरावर आम्हाला तो पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला कचरा दिसत होता. त्यावेळी वर्गातला एक मुलगा बोलता बोलता म्हणाला, "मोदींनी साफसफाई तर करायला सांगितली, पण कचरा टाकायला कचराकुंड्याच नाही दिल्या." सगळेजण नेहमीप्रमाणे विनोद समजून त्यावर हसले. तो विषय तिकडेच संपला.
त्यावेळी माझ्या डोक्यात असं आलं की, देशभरात गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा दिली. त्यासाठीचा भव्य सोहळा पार पडला. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमिर खान, सचिन तेंडूलकर, कमल हसन, सलमान खान, प्रियंका चोप्रा तसेच योगगूरू बाबा रामदेव, काँग्रेस खासदार शशी थरूर, गोवा राज्यपाल मृदूला सिन्हा यांना आमंत्रण देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' यांच्या संपूर्ण टीमलासुद्धा पंतप्रधानांकडून आमंत्रण मिळाले. सर्वच सेलिब्रिटीज् 2 ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या लोकांनी आपल्या ओळखीच्या आणखी नऊ लोकांना आमंत्रण देऊन या अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आदरपुर्वक या आमंत्रणाचा स्वीकार केलेला आहे.
सेलिब्रिटीजचा सहभाग या अभियानाला नक्कीच फायदेशीर ठरेल यात काही शंका नाही. अनेक लोक आपल्या आवडत्या सेलिब्रिटीने हे काम हातात घेतले म्हणून स्वतः त्यात उत्साहाने भाग घेतील. मोदींनी सेलिब्रिटीजची निवडदेखील फार काळजीपुर्वक केली आहे. यातील 9 जण समाजातील वेगवेगळ्या समूहाचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे देशातील संपूर्ण जनतेला स्वच्छ भारत अभियानात सामील करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसून येतो. तसेच सोशल मिडीयावर सध्या क्लीन इंडियाचा ट्रेंड जोरदार सुरू आहे.
हा सगळा उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. पण हा कितपत यशस्वी होणार? त्यात सातत्य टिकून राहणार का? कोणताही उपक्रम यशस्वी होण्यासाठी जनतेची इच्छाशक्ती आणि सहकार्य या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात. आपला देश स्वच्छ असावा असे प्रत्येकालाच वाटणारच, पण त्यासाठी आपण किती कष्ट घेणार आहोत? कदाचित अगदी पुढचा महिनाभर सगळेजण श्रमदान करतील. काहिजण दोन महिने करतील. परंतू शेवटपर्यंत प्रामाणिकपणे कितीजण टिकून राहतील? इतके वर्ष गुटखा, तंबाखू खाऊन लगेच रस्त्यावर थुंकायची, हातातला कागद पटकन रस्त्यावर टाकून द्यायची सवय इतक्या लवकर कशी जाणार?
जरी हातातला कागद कचरापेटीतच टाकायचा ठरवला, परंतू जर दूरदूरपर्यंत कचराकुंडी उपलब्धच नसेल तर कागद वैतागून रस्त्यावरच फेकला जाणार. कारण प्रत्येकाला तो बॅगेत घालून घरी घेऊन जाणं शक्य नसेल कदाचित. त्यामुळे इथे सरकारची पण लवकरात लवकर जागोजागी कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ठरते. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचे आवाहन करणारे बोर्डस् लावता येऊ शकतील. सध्या हे बोर्डस् शहरातील फक्त प्रमुख रस्त्यांवरच आढळतात. त्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे. यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होऊ शकते. हा उपक्रम यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा आहे. तेव्हाच या अभियानाचा वैयक्तिक पातळीवर विचार करून गोष्टी अमलात आणल्या जाऊ शकतात.
शहरांमध्ये वैयक्तिक पातळीवर आपण स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला तरीही अजूनही आपल्याकडे अनेक गावांमध्ये शौचालये/स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. अर्थात पंतप्रधानांनी वेळोवेळी प्रत्येक भाषणातून गावागावांत स्वच्छतागृहे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ही समस्या लवकरच दूर होईल अशी आपण आशा करू शकतो.
याआधीदेखील सरकारने याप्रकारची अनेक अभियान राबवले आहेत. 2012 साली केंद्रीय पर्यटन मंत्री सुबोध कान्त सहाय यांनी 'क्लीन इंडिया कॅम्पेन'ची सुरूवात केली होती. त्याची दिल्ली येथील कुतूब मिनारपासून झाली होती. विदेशातील पर्यटकांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या संख्येत वाढ करणे हे त्यामागचे उद्देश्य होते. पीपीपी(पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिप) मॉडेलचा वापर करून 100 राष्ट्रीय स्मारकांचा परिसर सुधारून त्याला स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल बनवण्यात येणार होते. त्याचप्रमाणे कचरा विल्हेवाट, प्यायच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, पार्किंग लॉट्सची देखरेख यासारख्या सुविधांचादेखील समावेश करण्यात आला होता. या अभियानाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी रेडिओ जिंगल्स आणि पोस्टर्स तयार करण्यात आले होते. परंतू त्याप्रमाणात त्याची जाहीरात झाली नसल्याने मर्यदित लोकांपर्यतच या अभियानाची माहिती पोचली.
पुढील स्लाईडवर बघा, सामान्य नागरिक आणि सरकार यांच्या परस्पर सहकार्यानेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो.