आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi In Defence Minister Manohar Parrikar News

पाकच्‍या बोटीमुळे सरकारची गोची; चुकीच्या वक्तव्याने वस्तुस्थिती बदलत नाही: पर्रीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ बंगळुरू- गुजरातच्या समुद्रात गेल्या ३१ डिसेंबरला दिसलेल्या पाकिस्तानी बोटीशी संबंधित एक व्हिडिओ उघडकीस आला आहे. सुरतमध्ये मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. आपल्याच आदेशावरून ही बोट उडवण्यात आली, असा दावा भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बी. के. लोशाली त्या व्हिडिओत करत आहेत. लोशाली यांच्या दाव्यामुळे त्या बोटीवरील चालक दलानेच आग लावल्याचा दावा करणारे केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘चुकीच्या वक्तव्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. आम्ही या वक्तव्याची चौकशी करू,’ असे पर्रीकर म्हणाले. लोशाली यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकतेही त्यांनी दिले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर तटरक्षक दलाने लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सुरतमध्ये केलेल्या दाव्यावर खुलासा मागितला आहे. बंगळुरूमध्ये पर्रीकर म्हणाले की, ‘आम्ही जुन्याच दाव्यावर ठाम आहोत. बोट तटरक्षक दलाने उडवली नाही याचे पुरावेही मी देईन.’ संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लोशाली यांनीही घूमजाव केले. ‘बोटीवरील लोकांनीच तिला आग लावली,’ असे ते म्हणाले.
लोशाली यांची दोन वक्तव्ये...
आधी : बोट उडवून द्या, त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा नाही : ‘तुम्हाला ३१ डिसेंबरच्या रात्रीची आठवण असेल. आम्ही पाकिस्तानी बोट उडवून दिली होती. मी त्या रात्री गांधीनगरमध्ये होतो. मी म्हणालो - बोट उडवून द्या. त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा कदापि नाही.’

नंतर म्हणाले : जे छापून आले त्यात तथ्य नाही : ‘हे प्रकरण माझ्याकडे नाही. जे छापून आले त्यात तथ्य नाही. मी असे वक्तव्य केले नाही. फक्त राष्ट्रविरोधी तत्त्वांना बिर्याणी खाऊ घालण्याची गरज नाही एवढेच म्हणालो होतो.’
कराचीहून निघाली होती संशयित बोट
बोटीला ३१ डिसेंबरच्या रात्री पोरबंदर समुद्र किनाऱ्यापासून ३६५ किमी अंतरावर आग लागली होती. ती कराची केटी बंदरावरून निघाली होती, तिला तेथूनच निर्देश मिळत होते, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते. बोटीवरील चार संशयितांनीच ती उडवली होती, असे तटरक्षक दलानेही सांगितले होते.

बोट उडवणे की खोटे बोलणे हा गुन्हा?
संरक्षण मंत्रीजी, पाकिस्तानी बोट उडवणे मोठा गुन्हा आहे की देशाशी खोटे बोलणे? जर ते दहशतवादी होते तर त्यांना उडवण्यात लाज कसली? - मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते

सरकार कसे काम करते हे यावरून लक्षात येते. हे म्हणजे एक हात काय काम करत आहे याचा दुसऱ्या हाताला पत्ताच नसावा तसे हे आहे. - दीपक वाजपेयी, आप प्रवक्ता
संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यावर संशय : संरक्षण मंत्रालयानुसार तटरक्षक दलाने बोटीचा पाठलाग केला. घेरले गेल्यानंतर चार संशयितांनी बोट उडवून दिली. आता लोशालींच्या वक्तव्यानंतर पाकने भारताच्या दाव्यावर संशय घेतला. भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले.