आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय गोयल पायऊतार, डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे दिल्ली भाजप अध्यक्षपदाची सूत्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली भाजपचे अध्यक्ष विजय गोयल यांनी आज पदाचा राजीनामा दिला. आता दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली जाणार आहेत.
विजय गोयल यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने भाजपचे नेतृत्त्व नव्या अध्यक्षांच्या शोधात होते. मात्र विजय गोयल यांच्यासारखा ताकदीचा नेता दिल्लीचे प्रभारी नितीन गडकरी व जेटलींच्या पसंतीला पडत नाहीये. त्यामुळे हर्षवर्धन यांच्याकडे दुहेरी जबाबदारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाही हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात येणार आहेत. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका लवकर झाल्या नाहीत तर पक्षाचे वरिष्ठ आमदार जगदीश मुखी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविण्याचा विचार होऊ शकतो. मात्र पुढील सहा महिने तर यात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभेच्या निवडणुका होताच गोयल यांना पदावरून हटविण्याचा विचार सुरु होता. पण पक्षातील गोयल समर्थक एका ज्येष्ठ नेत्याने आणि खुद्द गोयल यांनीच लोकसभा निवडणुका माझ्या नेतृत्त्वाखाली लढवाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, गोयल यांना आता राज्यसभेत पाठविण्यात आले आहे. पुढील काळात दिल्ली भाजपचे नेतृत्त्व म्हणून हर्षवर्धन यांनाच पुढे करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचे सरकार केंद्रात आले तर गोयल यांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला आहे. विजय गोयल यांची प्रतिमा दिल्लीत खराब आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यातच सध्या दिल्लीत केजरीवाल विधानसभेत आहेत. त्यामुळे मवाळ हर्षवर्धन यांच्याकडे दिल्ली भाजपची धुरा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.