आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिंपच्या अयोध्‍येतील 84 कोसी परिक्रमेवरून संसदेत गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारने विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील 84 कोसी परिक्रमेवर बंदी घातल्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आक्रमक सदस्यांनी एकमेकांवर कडाडून टीका केली. भाजप राज्यघटनेचे पालन करत नाही, न्यायालयाचे आदेशही मानत नाही, अशा शब्दांत सप नेते मुलायमसिंह यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. त्यामुळे संतापलेल्या भाजप सदस्यांनी उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले.


लोकसभेत मुलायमसिंह यादव यांनी, भाजप गुंडगिरी करून देशातील जातीय सलोख्याला सुरुंग लावून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करत आहे. त्यांची गुंडगिरी कशी मोडून काढायची हे आम्हाला चांगले माहीत आहे. यापूर्वीही आम्ही त्यांच्या गुंडगिरीला लगाम घातला आहे, असा आरोप केला. भाजप न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहे. राज्यघटनेचाही अवमान करून देशद्रोही कारवाया करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


मुलामयसिंह यांच्या टीकेला भाजपचे स्वामी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले. अयोध्येत संतांना अटक करून उत्तर प्रदेश सरकारने हिंदूंचा अपमान केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार तत्काळ बरखास्त करा, अशी मागणी त्यांनी केली. सपा सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत 30 दंगली झाल्या आहेत. त्यात हिंदूंचा छळ करण्यात आला आहे, असेही आदित्यनाथ म्हणाले.


अटकेतील विंह‍िप नेत्यांची सुटका
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अटकेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या सुटकेचा आदेश दिल्यानंतर विहिंपचे आंतरराष्ट्रीय संघटक अशोक सिंघल यांची सुटका करण्यात आली, तर प्रवीण तोगडिया यांना फैजाबाद तुरुंगातून इटा तुरुंगात हलवण्यात आले. सिंघल यांची उन्नाव येथील विश्रामगृहातून सुटका करून विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले. रविवारी विहिंपच्या 2454 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्याविरुद्ध रंजना अग्निहोत्री यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.


विहिंप नेत्यांची निदर्शने
विहिंपच्या नेत्यांनी बाराबंकी, अलाहाबाद आणि शहजहानपूर जिल्ह्यात अटकेच्या निषेधार्थ सोमवारी निदर्शने केली. दिल्लीमध्ये जंतरमंतरवरही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली.


हिंदूंचा ठेका कुणी दिला : यादव
देशात हिंदूंच्या 1 लाख जाती आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा ठेका विहिंपला कुणी दिला, असा सवाल करत विहिंप हिंदूंच्या राजकारणाची ठेकेदार बनत चालली आहे, असे संयुक्त जनता दलाचे शरद यादव म्हणताच भाजप सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळाला सुरुवात केली. भाजप आणि सपा यात्रेवरून राजकारण करत असल्याचा आरोप बसप नेत्या मायावती यांनी केला. त्यांनीही उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.


फिक्सिंग नाहीच- सिंघल
84 कोसी परिक्रमेवरून सपा-भाजपमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे सुटकेनंतर अशोक सिंघल म्हणाले. सपाने मुस्लिमांची मते मिळवण्यासाठीच बंदी घातल्याचा आरोप त्यांनी केला.


राष्ट्रपती राजवट लागू करा
उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अयोध्येतील परिक्रमा थांबवण्यासाठी केंद्र सरकार काहीही प्रयत्न करत नसल्यामुळे ते ही राज्य सरकार इतकेच जबाबदार आहे. जातीय तणाव निर्माण करणारे उत्तर प्रदेश सरकार तत्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा.’’
मायावती, बसप नेत्या


जनाधार गमावल्याने जळफळाट
भाजपने जनाधार गमावला आहे. त्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे. त्यांची कोणतीही व्होट बँक राहिलेली नसल्याने ते दंगली पेटवू पाहत आहेत. त्यांनी व्होट बँकेचे राजकारण थांबवले पाहिजे. लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत.’’
मुलामयसिंह यादव