नवी दिल्ली - वाहतुक नियमांचे उल्लंघन आता फक्त दंड किंवा तुरुंगवासापुरतेच मर्यादित राहणार नाही. वारंवार नियम तोडल्यास आता
आपला वाहन परवाना एक ते पाच वर्षांसाठी रद्द होऊ शकतो. केंद्र सरकारने रस्ते वाहतुक आणि सुरक्षा विधेयकाच्या प्रस्तावित मसुद्यात पेनल्टी पॉइंट स्कीमचा समावेश केला आहे.
मसुद्यानुसार, आता नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्ह्याच्या स्वरुपानुसार वाहनधारकाला एक ते चार पॉइंट दिले जातील. अशाप्रकारचे बारा पॉइंट जमा झाल्यास त्याचा परवाना एका वर्षासाठी रद्द करण्यात येईल. मग त्याला पुन्हा नव्याने परवाना घ्यावा लागेल.
परवाना घेतल्यानंतर पुन्हा नियमांचे उल्लंघन केले आणि त्यानंतरही १२ पॉइंट जमा झाले तर त्याचा परवाना ५ वर्षांसाठी रद्द केला जाईल. विशेष म्हणजे, १२ पॉइंटचा हा फॉर्म्युला फक्त तीनच वर्षांसाठी असेल. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने पॉइंट सिस्टिम लागू होईल. याची नोंदणी राष्ट्रीय पातळीवर ठेवली जाणार आहे. शिकाऊ परवाना रद्द होण्यासाठी चारच पॉइंटची अट असेल. एखाद्या मान्यताप्राप्त वाहन प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय शिकाऊ वाहन चालकांना परवाना मिळू शकणार नाही.
गुन्हा - पॉइंट कंसामध्ये
असुरक्षित वाहनांचा वापर (३), नोंदणीकृत नसलेल्या वाहनांचा वापर (३), अतिवेगाने वाहन चालवल्यास (पहिल्यांदा २ आणि दुस-यांदा ३), धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास(३), मद्यपान करून वाहन चालवल्यास (३), सिग्नल तोडल्यास(३), सीट बेल्ट न लावल्यास (२), हेल्मेट न घातल्यास(२), वाहन चालवताना
मोबाइलचा वापर (२), वाहनातील मुलांच्या जागेबाबत (२), दृष्टीसंबंधित गुन्ह्याबाबत (२), मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिक जण(२), वाहतुकीत अडथळा निर्माण केल्यास(१), वेगवान शर्यतीचे प्रदर्शन (२), आदेशाचे उल्लंघन अथवा अडथळा(३)