आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Inflation Defeating, Now Control On That, Rahul Ordered To Congress CM

महागाईमुळेच हरलो, आता तरी आळा घाला, राहुल यांचा कॉंग्रेसी मुख्‍यमंत्र्यांना आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवास जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी महागाई हेही एक प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता सरकार महागाई रोखण्यासाठी काहीतरी ठोस कृती करत आहे, असा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यातही महागाईचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.
राहुल यांनी काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला. महागाई कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही उपायदेखील सुचवले. लोकसभा निवडणुकांना चार महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. महागाई आणि भ्रष्टाचार हे दोन्ही मुद्दे राहुल गांधी यांनी गांभीर्याने घेतले आहेत. या दोन्ही मुद्दय़ांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा सुस्पष्ट संदेश राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यांतील सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) मजबूत करण्याचा तसेच शेतकर्‍यांचा भाजीपाला, फळेविक्रीसाठी नवे मॉडेल्सही सुचवले. या बैठकीत हरियाणा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महागाई रोखण्याचे फॉर्म्युले बैठकीत सादर केले. या मुद्दय़ाकडे ‘टार्गेट ओरिएंटेड’ काम करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित नेत्यांना दिले. राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना कांद्याच्या दरवाढीचे उदाहरण दिले. निवडणूक काळात कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढले व निकाल जाहीर होताच त्यात घसरण झाली. आपली बाजू मांडताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाववाढीस केंद्राची कृषी धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप केला. कांदा दरवाढीच्या मुद्दय़ावर माध्यमांकडून महाराष्ट्राला वारंवार चर्चेत आणले गेले. यामागे कुणाचा हात आहे हे जाणून घेऊन त्याचा पर्दाफाश करावा लागेल. तसेच राजकीय आघाडीवर पक्षाला आणखी मजबूत करावे लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही भूमिका मांडताना चव्हाणांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कृषिमंत्री शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होता.
बाजार समिती कायद्यातून भाजीपाला वगळा
काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी सांगितले की, ‘बैठकीत हे मान्य करण्यात आले की, पराभवाचे प्रमुख कारण महागाई हे होते. महागाई कमी करण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांनी जानेवारीपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून फळे व भाजीपाला वगळावा म्हणजे शेतक-यांना त्यांची उत्पादने विक्रीचे पर्याय उपलब्ध होतील. ते थेट ग्राहकांना उत्पादने विकू शकतील. ग्राहकांनाही कमी किमतीत वस्तू मिळतील.