आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुरानंतर उत्तराखंडला भूकंपाचा धक्का, जनता भयभीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/डेहराडून - महापुराच्या प्रलयातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी उत्तराखंडला भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.5 नोंदली गेली. सुदैवाने कोठेही हानी झाली नसली तरी अगोदरच नैसर्गिक आपत्तीमुळे धास्तावलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका यामुळे चुकला.
दुपारी बाराच्या सुमारास हा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पिथोरागडमध्ये होता. दरम्यान, महापुरानंतर सुरू असलेले बचावकार्य अंतिम टप्प्यात असून पाऊस सुरू असतानाही जवानांनी 1350 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. दोन हजार लोक अजूनही अडकून पडले असल्याचा अंदाज असून बद्रीनाथ व हर्षिल भागात हे लोक आहेत.
दुसर्‍या दिवशीही सामूहिक अंत्यसंस्कार : 16 जूनच्या महाप्रलयानंतर सुरू झालेले बचावकार्य जवळपास पूर्ण झाले असल्याचा दावा लष्कराने केला. विविध ठिकाणी सापडलेल्या मृतदेहांवर त्याच भागांत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत असून केदारनाथमध्ये दुसर्‍या दिवशीही काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या भागात 260 मृतदेह सापडले असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.


अंत्यसंस्कारांच्या ठिकाणी मृतांच्या नातेवाइकांना परवानगी नाही. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. रामबाडा आणि गौरीकुंडातही सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.