आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Economincally Backward Class Now May Get Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिकदृष्‍ट्या मागास प्रवर्गाला आता मिळणार आरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गासोबतच आता आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचाही (ईबीसी) देशातील वंचित घटकांच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. ईबीसी वर्गातील लोकांच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.


सर्व प्रकारच्या योजना आणि धोरणांमध्ये ईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे प्रयत्न सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव इतर मंत्रालयांकडे विचारार्थ पाठवण्यात आला असून लवकरच त्यास मंजुरी मिळू शकते.


मेजर जनरल (निवृत्त) एस.आर.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने 2010 मध्ये ईबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. आयोगाने सुचवलेली आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारने तीन वर्षांनंतर मान्य केली आहे. ईबीसी प्रवर्गास किती प्रमाणात आरक्षण दिले जाईल याबाबत कोणतीच माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. याबाबतचा प्रस्ताव सर्व केंद्रीय मंत्रालयांकडे पाठवण्यात आला आहे.
विविध मंत्रालयांकडून आरक्षणाबाबतच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच आरक्षणाचे प्रमाण सांगता येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आयोगाच्या अन्य शिफारशी मान्य करण्याविषयीदेखील तयारी सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील अधिका-याने दिली. ईबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याविषयी सामाजिक न्याय विभाग विचार करत आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाला (ओबीसी) मिळणा-या सर्व सुविधा ईबीसी प्रवर्गास देण्यासंबंधीचा मुद्दा केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्रालयाने घेतला आहे.


देशात सहा कोटी आर्थिकदृष्ट्या मागास
देशात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील घटकांची संख्या सुमारे 6 कोटी आहे. या प्रवर्गातील लोकांचे उत्पन्न दोन लाखांपेक्षाही कमी आहे. सामान्य प्रवर्गातील सर्व बीपीएलधारक परिवारांचा समावेश ईबीसी प्रवर्गात करण्यात यावा अशी शिफारस 2004 मध्ये नेमलेल्या आयोगाने केली होती. आयकराच्या किमान उत्पन्न मर्यादेपेक्षाही कमी उत्पन्न असणा-या सामान्य प्रवर्गातील लोकांचा ईबीसीमध्ये समावेश करण्यात यावा असेही त्या वेळी सांगण्यात आले होते.