नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात नव्याने आरोपपत्र दाखल केले अाहे. ब्रिटिश नागरिक आणि या प्रकरणातील मध्यस्थ मिशेल जेम्स आणि त्याच्या काही भारतीय सहकाऱ्यांच्या भूमिकेचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे. ईडी या प्रकरणातील मनी लाँडरिंगचा तपास करत आहे.
हे १३०० पानांचे आरोपपत्र या आठवड्याच्या सुरुवातीला विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून मिशेलला ३० दशलक्ष युरो (२२५ कोटी रुपये) मिळाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कंपनीला १२ हेलिकॉप्टरच्या खरेदीचा करार मिळावा यासाठी ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती, असा उल्लेख आरोपपत्रात आहे. न्यायालय या पुरवणी आरोपपत्राची लवकरच दखल घेईल, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. ईडी तसेच सीबीआयने या प्रकरणात तीन मध्यस्थांची चौकशी सुरू केली आहे. त्यात मिशेल जेम्स, गुइदो हिश्के आणि कार्लो गेरोसा यांचा समावेश आहे. मिशेलच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढल्यानंतर आता ईडी आणि सीबीआय या दोन्ही संस्थांनी त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. भारतीय माध्यमांनी दुबईत अलीकडेच मिशेलची मुलाखत घेतली होती. आता त्याने तपासात सहभागी व्हावे, अशी या दोन्ही संस्थांची इच्छा आहे. ईडीने या प्रकरणात हे दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात मिशेलची करारातील भूमिका, त्याने केलेले भारताचे दौरे आणि त्याचे देण्या-घेण्याचे व्यवहार यांच्याशी संबंधित माहितीचा त्यात उल्लेख आहे. ईडीने ब्रिटनकडे मिशेलच्या प्रत्यारोपणाची मागणी केली आहे. दोन्ही देशांतील करारानुसार असे आरोपपत्र दाखल होणे आवश्यक असल्यानेच ही कारवाई केली असल्याचे समजते.
इतर दोन मध्यस्थांनाही दिली जात होती लाच तपासात आढळले की, ऑगस्टा वेस्टलँडचे सीईओ ब्रुनो स्पॅग्नोलिनी मिशेल आणि इतर दोन मध्यस्थांना सल्लागार कंत्राट या नावाने लाच देत होते. एकट्या मिशेललाच ३० दशलक्ष युरो (२२५ कोटी रुपये) एवढी रक्कम देण्यात आली. ही रक्कम दुबईतील कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आली. मिशेलने त्याच्या दोन भारतीय सहकाऱ्यांसह मीडिया फर्म स्थापन केली होती, पण ती निष्क्रिय होती.
पुढील स्लाइडवर वाचा, दोन भारतीयांचाही उल्लेख
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)