आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरभद्र यांच्या पत्नीची आठ कोटींची संपत्ती ताब्यात घेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नीची सुमारे ८ कोटींची संपत्ती ताब्यात घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालय लवकरच ही संपत्ती ताब्यात घेणार आहे.

मार्च महिन्यात ईडीने वीरभद्र यांचे विमा, बँकेसंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. वीरभद्र यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांचाही बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाने संपत्ती ताब्यात घेण्यासंबंधीचा आदेश बजावला होता. तत्पूर्वी न्यायालयात वीरभद्र व त्यांच्या पत्नी प्रतिभा यांचे जबाब, एलआयसी एजंट आनंद चौहान यांचे जबाब तपासण्यात आले. चौहान सध्या तुरुंगात आहे.

२३ मार्च रोजी हा आदेश ईडीने दिला होता. दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलाश-१ मध्ये प्रतिभा सिंह यांच्या नावे दोन फ्लॅट आहेत. त्यांच्या व पतीच्या नावे अनेक विमा पॉलिसी, बँकेत मोठी रक्कम आणि एफडी आहे. निधींचा वापर विमा खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचे तपासांती उघड झाले आहे. तेथून तो बँकेच्या खात्यापर्यंत पोहोचवण्यात आला. त्यानंतर त्या पैशामधून मालमत्तेची खरेदी झाली.

ईडीचा फौजदारी खटला
बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सीबीआयनेदेखील यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्येही करण्यात आला होता. सीबीआयच्या एफआयआरमध्ये प्रतिभा, चौहान, त्यांचे भाऊ सी. एल. चौहान यांना आरोपी ठरवण्यात आले होते. त्यानुसार २००९ ते ११ दरम्यान वीरभद्र यांनी ६.१ कोटी रुपयांच्या पॉलिसी घेतल्या होत्या. त्यांच्या व कुटुंबीयांच्या नावाने त्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी शेतीतून झालेला नफा हा स्रोत दाखवण्यात आला होता.
फलोद्योगातून उत्पन्न
वीरभद्र व प्रतिभा सिंह यांनी बेहिशेबी उत्पन्नाचा स्रोत म्हणून फलोद्योगातून झालेले उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ‘चुन्नीलाल चौहान ऑफ युनिव्हर्सल अॅपल असोसिएट’ नावाने हा फळविक्री उद्योग असल्याचे दाखवण्यात आले होते. त्याचाही तपासातून पर्दाफाश झाला.

चौकशीत नकार
ईडीने अलीकडेच प्रतिभा व मुख्यमंत्र्यांचे पुत्र विक्रमादित्य यांचीही कसून चौकशी केली आहे. परंतु मी अगर माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी काही गैर केलेले नाही, असा दावा वीरभद्र यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...