आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हिपॅटायटिस सी'वर प्रभावी औषधी भारतात, दिल्लीत एम्समध्ये ११ रुग्णांवर यशस्वी चाचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हिपॅटायटिस सीसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी आता भारतातही स्वस्त आणि प्रभावी औषधी लवकरच उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत लाखाे रुपयांना विकली जाणारी ही औषधी एक लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात या
औषधांची ११ रुग्णांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली असून सहा महिन्यांनी हे औषध विक्रीसाठी उपलब्ध होईल.
एम्सच्या तज्ज्ञांनी चाचणीनंतर या औषधाला सॉफॉस्विर असे नाव दिले असून हिपॅटायटिस सीवर हे औषध १०० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. एम्समधील गॅस्ट्रो डिपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉ. एस. के. आचार्य यांनी जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त याबाबत
माहिती दिली. एम्समध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. आचार्य यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात एम्समधील ११ रुग्णांवर ग्लोबल चाचणी घेण्यात आली. ती चाचणी प्रभावी आणि यशस्वी ठरल्यानंतर सध्या या हिपॅटायटिस सीची लागण झालेल्या सुमारे ८० रुग्णांवर गेल्या तीन महिन्यांपासून या औषधाचा वापर करून उपचार केले जात आहेत.

या उपचार पद्धतीत सहा महिन्यांपर्यंत रुग्णाला औषधाचे सेवन करावे लागते. अमेरिकन बाजारात सहा महिन्यांपर्यंत हे औषध सेवन करावे लागले, तर त्याचा खर्च ८४ हजार डॉलर (जवळपास ५० लाख रुपये) इतका येतो. त्या तुलनेत भारतात येणारा खर्च तुलनेत खूपच
कमी आहे. या औषधांच्या मदतीने आपण हेपॅटायटिस सीसारख्या आजारापासून आपल्याला दिलासा मिळू शकतो, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले.

हिपॅटायटिस संक्रमण रक्तातून
देशात हिपॅटायटिस बी व सीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या दोन्हींचे व्हायरस रक्तातून संक्रमित हा ेतात. अनेक रुग्णांना रक्त देण्यासाठी एकच सुई वापरली गेल्यास किंवा अमली पदार्थांचे सेवन करताना इंजेक्शन वापरल्यास त्यातूनही हिपॅटायटिसची लागण होऊ शकते.

४ कोटी लोकांना फटका
डॉक्टरांनी सांगितले की, देशभरात जवळपास ४ कोटी लोक हेपॅटायटिस बीमुळे पीडित आहेत. याउपरही देशभरात या आजाराचा प्रभाव रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही. त्याची कारणे याबाबतच्या जागरूकतेचा अभाव आणि सरकारची उदासीनता ही आहेत. तज्ज्ञांच्या मते, अनेक राज्यांत अद्यापही त्याचे लसीकरण झालेले नाही. इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलिएरी सायन्सचे संचालक डॉ. एस. के. सरीन यांनी सांगितले की, हिपॅटायटिस बीची लस उपलब्ध झाली आहे. बाळाच्या जन्मावेळीच ही लस देऊन बचाव होऊ
शकतो.