आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Issues Revised Guidelines For Transparency In Party Funds

निवडणुकीत उमेदवाराच्या हातात कॅश देऊ नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणुकीतील काळ्या पैशांच्या भस्मासुराला आवर घालण्यासाठी निवडणूक आयोगाने नवी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा मुसदा जारी केला आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या हाती थेट रोख रक्कम देऊ नये, अशी मुख्य तरतूद त्यामध्ये असून या मसुद्यावर राजकीय पक्षांची मते मागवण्यात आली आहेत. त्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात आयोगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती. ती अमलात आणण्यापूर्वी राजकीय पक्षांना या मसुद्यावर सूचना, हरकती पाठवण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा राजकीय पक्षांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येत्या 14 मार्चपर्यंत पक्षांनी सूचना, हरकती नोंदवल्या नाहीत, तर या सर्व तरतुदी राजकीय पक्षांना मान्य असल्याचे गृहीत धरण्यात येईल व सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरवर्षी लेखाजोखा सादर करा : प्रत्येक राजकीय पक्षाने दरवर्षी 30 ऑक्टोबरपर्यंत आपल्या पक्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा, असे या मसुद्यात म्हटले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून आयोगाने या मुद्दय़ाचा त्यात अंतर्भाव केला आहे.

चेक, ड्राफ्टने जमा करण्याचा नियम
आयोगाच्या सुधारित तत्त्वांमध्ये सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे उमेदवाराला रोख रक्कम देण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अकाउंट पेयी चेक अथवा ड्राफ्टने उमेदवारास पक्ष निधी देण्यात यावा अथवा बँक अकाउंटमध्ये हस्तांतरित करण्यात यावा, असे आयोगाने म्हटले आहे. ही रक्कम अर्थातच आयोगाने निर्धारित केलेल्या खर्चाच्या रकमेपक्षा जास्त नको, असेही बजावण्यात आले.