आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 दिवसांत उत्तर द्या, मुंडेंना नोटीस; जाहीर वक्तव्यावरून निवडणूक आयोगाचा दणका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या लोकसभा निवडणुकीत 8 कोटी रुपये खर्च केल्याची जाहीर कबुली देणारे भाजप नेते व खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. यावर आयोगाने वीस दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुंडेंच्या वक्तव्याबद्दल चर्चा करण्यात आली. या वक्तव्याची सीडी उपलब्ध झाल्यावर त्याची शहानिशा करण्यात आली. यादरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल करत मुंडेंवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

प्रकरण काय : बीडचे खासदार असलेले मुंडे लोकसभेत पक्षाचे उपनेते आहेत. 27 जूनला मुंबईत विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘बियॉन्ड अ बिलिअन बॅलेटस्’ या पुस्तक प्रकाशन समारंभात त्यांनी आपल्या निवडणूक कारकीर्दीची रोचक माहिती दिली. 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवताना केवळ 29 हजार रुपये खर्च झाले होते. मात्र, 2009 मध्ये आपल्याला 8 कोटी खर्च करावे लागल्याचे त्यांनी सांगून टाकले. या कबुलीनंतर आता ते अडचणीत आले आहेत.

त्यांनी स्वत:च मान्य केले
मुंडेंनी स्वत:च आठ कोटी खर्च केल्याचे मान्य केले आहे. माझ्या मते निवडणूक आयोगाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे.
संजय निरुपम, काँग्रेस खासदार

‘तो’ कार्यकर्त्यांवरचा खर्च असेल
शपथपत्रात जेवढी रक्कम दाखवली तेवढाच खर्च मुंडेंनी केला आहे. आठ कोटी रुपये कार्यकर्ते तसेच इतर साहित्यावर खर्च झाले असतील.
शाहनवाज हुसेन, भाजप नेते

शपथपत्रात चुकीची माहिती!
आयोगाच्या नोटिसीत म्हटले आहे की, मुंडे यांनी 8 जून 2009 रोजी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केलेल्या शपथपत्रात लोकसभा निवडणुकीत आपण 19 लाख 36 हजार 922 रुपये खर्च केल्याचे म्हटले होते. याची पूरक बिले त्यांनी सादर केली होती. मुंडेंनी जाहीरपणे 8 कोटी खर्च केल्याचे कबूल केले आहे. याचा अर्थ शपथपत्रात त्यांनी चुकीची माहिती दिली होती. लोकप्रतिनिधी उत्तरदायित्व कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल खासदार म्हणून अपात्र का ठरवले जाऊ नये?