आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission To Hold All party Meet On Poll Preparedness

निवडणूक सुधारणांवर शनिवारी बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी विधी आयोगाने शनिवारी बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणार्‍या उमेदवारांचे भवितव्य तसेच जनमत चाचणीवर बंदी घालण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित मानले जाते.

निवडणूक सुधारणांअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्यात येईल. या विषयावर शिफारशी तयार करण्यासाठी महिनाभरापूर्वी आयोगाने सर्व पक्षांना याबाबत पत्र पाठवले होते. मे 2013 च्या पत्रानुसार एखाद्या खटल्यात निर्वाचित व्यक्ती दोषी आढळल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करावयाचे काय किंवा त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करावेत याविषयी राजकीय पक्षांचे मत मागण्यात आले होते. विधी आयोग सरकारला कायदेशीर सल्ला देते. प्रत्येक सरकारमध्ये निवडणूक सुधारणांवर भर दिला जातो.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यापर्यंत जनमत चाचणी अहवाल प्रकाशित किंवा प्रसारित करू नये यासंबंधी आयोग शिफारस करणे अपेक्षित आहे. सध्याच्या कायद्यानुसार मतदानाआधी 48 तास जनमत चाचणी प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाजपशिवाय सर्व राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, अ‍ॅटर्नी जनरल यांनी जनमत चाचण्यांवरील बंदीला पाठिंबा दर्शवला आहे.

निवडून आलेला सदस्य अपात्र ठरवण्याच्या सध्याच्या नियमाशिवाय उमेदवाराच्या पात्रतेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यावर विचार होत आहे. प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यास संबंधिताला अपात्र ठरवावे का, याबाबत राजकीय पक्षांकडे मत मागवण्यात आले. याचे उत्तर होकारार्थी असेल तर त्यासाठीची यंत्रणा कशी असावी यावर मत मागितले आहे. उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला निवडणूक खर्चासाठी सरकारने पैसे द्यावेत का? निधी द्यावयाचा असेल तर त्याचे निकष व स्वरूप काय असेल, अशी विचारणा करण्यात आली आहे. या मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर विधी आयोगाचे अध्यक्ष, निवृत्त न्या.ए. पी. शाह केंद्र सरकारला निवडणूक सुधारणांबाबत शिफारशी देतील.