आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Expenditure To Be Increases, Parties Demand To Election Commission

वाढत्या महागाईत सध्याची निवडणूक खर्च मर्यादा वाढवा, पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाढत्या महागाईत सध्याची निवडणूक खर्च मर्यादा(16-40 लाख रुपये) अव्यवहार्य ठरवत त्यात वाढ करण्याची मागणी बहुतांश राजकीय पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली. आम आदमी पार्टीने मात्र सध्याची मर्यादा पुरेशी असल्याची भूमिका घेतली. आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत पक्षाच्या जाहीरनाम्याचा समावेश करण्यासही विविध पक्षांनी विरोध केला. निवडणूक आयोगाने विविध मुद्द्यांवरचर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती.
भाजप, माकप, जदयूसह अन्य प्रादेशिक पक्षांनी निवडणूक खर्च मर्यादा वाढवण्याची मागणी केली. बैठकीस उपस्थित कॉँग्रेस प्रतिनिधीची प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र, त्यांनीही अनुकूल भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणूक खर्चाची मर्यादा 16 लाख रुपये आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात साधारण 5 विधानसभा मतदारसंघ असतात. त्यामुळे लोकसभेची खर्च मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी जदयूचे नेते जावेद रझा यांनी केली.
भाजपने कमी टप्प्यांत निवडणुका घेण्याची मागणी केली. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत कडक उन्हामुळे मे महिन्यात निवडणुका घेऊ नयेत. तसे केल्यास तिथे कमी मतदान होईल, अशी भीती भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. भाजप, जदयूसह अन्य पक्षांनी राजकीय पक्षांचा जाहीरनामा आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत आणण्यास विरोध केला. जाहीरनाम्यामध्ये मोफत योजनांचे आश्वासन देणे हे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार असल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी भाकपने केली आहे.मात्र, जाहीरनाम्यात दीर्घकालीन दृष्टीकोन असतो,असे सांगत विविध पक्षांनी भाकपला विरोध केला.
आप समाधानी
आमदार निधी मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पार्टीने अपेक्षित भूमिका घेतली आहे. सध्याच्या खर्च मर्यादेवर आम्ही समाधानी आहोत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मर्यादित खर्च केला. राजकीय पक्षांनी मर्यादित खर्चात निवडणुका लढवाव्यात, अशी अपेक्षा आपचे नेते पंकज गुप्ता यांनी व्यक्त केली.
लोकांना पर्याय हवा : येचुरी
लोकांना व्यावहारिक पर्याय हवा असल्याचा दावा माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी केला आहे. माकप काँग्रेस आणि भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे. लोकांवर लादण्यात आलेल्या भार हलका व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. सार्वजनिक मालमत्तांची लूट होत असल्यामुळे लोक नाराज आहेत. भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोक आशादायक पर्यायाच्या शोधात आहेत, असे येचुरी यांनी येथे एका कार्यक्रमानंतर सांगितले.