आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माइकमध्ये काहीही बोला, वैष्णव जन...च ऐकू येईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या गांधी संग्रहालयातील एक यंत्र सध्या खूपच व्यग्र आहे. यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे-तुम्ही त्याच्या माइकवर काहीही बोला, यंत्रातून वैष्णव जन तो तेणे कहिए...चा आवाजच येईल.

गांधी स्मृतीचे स्वयंसेवक (स्वयंसेवकच गाइडची भूमिका करतात) रोहित यांनी सांगितले,‘यंत्र ११ वर्षांपूर्वीच लागले होते, पण अलीकडे त्याची विचारणा जास्त होत आहे. येथे येणारे बहुतांश पर्यटक एक वेळा माइकवर काही बोलून बापूंच्या प्रिय भजनाचा मुखडा ऐकतात.’
येथे एक हायपर इन्स्ट्रुमेंट आहे. आपल्या देशात या इन्स्ट्रुमेंटची सुरुवात १९८६ मध्ये झाली. गांधी स्मृतीचे डिजिटल संग्रहालय २००५ मध्ये झाले. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्याचे उद््घाटन केले होते. त्याच वेळी हे यंत्र लागले.

हे यंत्र दुसऱ्या मजल्यावरील डिजिटल संग्रहालयाच्या जिन्याजवळ आहे. येथे दोन हायपर इन्स्ट्रुमेंट आहेत. एकातून गांधींचे ‘वैष्णव जन’ हे प्रिय भजन तर दुसऱ्यातून त्यांची ‘रघुपती राघव राजा राम’ ही आवडती प्रार्थना ऐकता येते. ३० जानेवारी मार्गावरील क्रमांक पाचच्या बंगल्यात बापू राहत असत. मृत्यूच्या दिवशी या घरात राहण्याचा त्यांचा १४४ वा दिवस होता. त्या वेळी त्या बिर्ला हाऊस म्हणत असत. ३० जानेवारी १९४८ ला याच घरात त्यांनी अंतिम श्वास घेतला होता. केंद्र सरकारने १९७१ मध्ये या भवनाचे अधिग्रहण केले. त्याबदल्यात बिर्लांच्या कुटुंबीयांना ल्युटन झोनमध्ये दुसरा बंगला देण्यात आला. १९७३ मध्ये गांधी स्मृती आणि दर्शन समितीने त्याला संग्रहालयाचे रूप दिले. गांधींशी संबंधित प्रत्येक वस्तू तेथे आहे. भवनाच्या एका भागात चरखा आणि गांधींना प्रिय कुटीर उद्योगाच्या आठवणी जिवंत रूपात आहेत. काही लोक चरखा चालवतात, तर काही महिला शिलाईचे प्रशिक्षण घेतात.

गांधी स्मृतीच्या सेवेतून निवृत्त झालेले अशोककुमार सांगतात की, प्रशिक्षणात वंचित वर्गातील महिलांना प्राधान्य दिले जाते. स्मृती भवनात गांधींशी संबंधित हजारो चित्रे आहेत. प्रदर्शनी कक्षाच्या प्रवेशद्वारावर टांगलेला लिफाफाही पर्यटकांना आकर्षित करतो. सध्या आपल्याला पत्राच्या पत्त्यावर फ्लॅट क्रमांक,मोहल्ला, गल्ली आणि शहराचे नाव लिहावे लागते, तर बापूंचे पत्र त्या काळी फक्त त्यांचे नाव टाकले तरी पोहोचत असे. अशाच एका पत्रावर लिहिले आहे-महात्मा गांधी, जिथे असतील तिथे. म्हणजेच या पत्त्यावर गांधीजींना पत्र मिळत असे. हा लिफाफाही तेथे आहे.