आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी : फरारी की व्हिसल ब्लोअर? २२ नेते, मंत्र्यांवर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदींचे प्रत्येक ट्विट बातमीचा विषय बनत आहे. मग ते कौतुक करणारे असो की एखाद्याभोवती संशयाचे जाळे निर्माण करणारे असो. मोदी लंडनमध्ये बसून भारताचे राजकारण फिरवत ठेवत आहेत. १४ दिवसांत त्यांनी जवळपास दीडशे ट्विट केले. ‘तुम्ही सर्वात अवघड ‘विकेट्स’वरही ‘फ्रंट फूट’वरच खेळता. तुम्ही आमच्या पंतप्रधानांना कोणता सल्ला द्याल?’ असे एका फॉलोअरने त्यांना ट्विटरवर विचारले. त्यावर मोदींनी ट्विट केले ते असे-‘आमचे पीएम जाणकार आहेत. जेव्हा ते फलंदाजी करतात तेव्हा षटकार ठोकून ते चेंडू मैदानाबाहेर पाठवतात.’ एक दिवसापूर्वी त्यांनी प्रियंका- रॉबर्ट वढेरांबाबत ट्विट केले होते. ललित मोदींवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना ‘भगोडा’ म्हटले जाऊ लागले असले तरी ते स्वत:ला मात्र व्हिसल ब्लोअर सिद्ध करू इच्छित आहेत...

ललित मोदींनी ट्विटरवर ललितलीक्सला सुरुवात केली. प्रोफाइलमध्येच लिहिले- राजकीय माफियांच्या साफसफाईमध्ये व्यग्र. ट्विटद्वारेच त्यांनी ‘मला अधिकार द्या. भारताला भ्रष्टाचारमुक्त करून दाखवीन’ अशी घोषणा केली. आणि मग भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटाचा सिलसिलाच सुरू झाला. ‘भ्रष्टाचारासंबंधीची कोणतीही माहिती पाठवा, असे आवाहन करत त्यांनी curruptpoliticiansinindia@gmail.com हा ई-मेल आयडी दिला. एका ट्विटमध्ये मोदी म्हणतात, जे बदल्याच्या भावनेतून काम करत आहेत, त्यांनी तेही काचेच्या घरात राहतात हे लक्षात ठेवावे. मी रंग आणि त्याच्या प्रकारांच्या सर्व छटा समोर आणून दाखवीन. हळूहळू मी तथाकथित बीसीसीआय/ एफएम/ माफिया मालिका गाडून टाकायला सुरुवात करीन. काय घाई आहे? मित्रांनो, पिक्चर अजून बाकी आहे! मी जी नावे सांगेन, ती तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. मी त्यांना मीडिया आणि मंत्रालयासमोर स्वत:हून हजर होण्याची एक संधी देत आहे.

मोदींच्या प्रत्येक ट्विटमध्ये आव्हान आणि आता कोणाचे नाव येणार याबाबतचा सस्पेन्सही आहे. ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स क्षणाक्षणाला त्यांच्या ट्विटवर लक्ष ठेवून आहेत आणि मोदी फॉलोअर्सच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला थोडाही विलंब करत नाहीत. ‘कानपूरच्या एका दैनिकात सामान्य वार्ताहर असलेले राजीव शुक्ला कोट्यधीश कसे बनले?,’ असे त्यांना एका फॉलोअरने विचारले. त्यावर त्यांची चौकशी करण्याची कोणात हिंमत आहे काय? असे ट्विट मोदींनी केले. एका ट्विटमध्ये ओमिता नागपाल यांना लक्ष्य करताना लिहिले - सर्वात मोठा हवाला ऑपरेटर विवेक नागपालला ओमिताचा बॅगमॅन म्हटले जाते. त्यांच्याकडे बरीच माहिती आहे. कोणी त्यांची चौकशी केली.... नाही. का? माझे संकेत लक्षात घ्या आणि प्रतीक्षा करा.

दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी नागपालच्या व्यवहाराचा १०० पानांचा तपशीलच अपलोड केला. एका ट्विटमध्ये ते म्हणतात- आपण साफसफाई करत आहोत. ईडी व आयटीप्रमाणे ब्लॅकमेल करणार्‍या अधिकार्‍यांनाही सोडू नका. मॅच फिक्सिंगबाबत ते म्हणतात-चोर-चोर मावसभाऊ आहेत. एक काँग्रेस आणि दुसरा भाजप. रोजच्या अपडेट्सची प्रतीक्षा करा. मग आव्हानही देतात- लोकप्रतिनिधी, नोकरशहांनो, तुम्ही मोदी परिवाराकडून आदरातिथ्य, रोख रक्कम आदी कोणतीही मदत घेतली असेल तर ते जाहीर करा. माझ्याकडे काय माहिती आहे हे तुम्हाला माहीतच आहे ना?

मोदींचा टिवटिवाट
- मी सत्य सांगतोय. सूत्रांकडून त्यात काहीच नाही. फक्त वस्तुस्थिती.
- हा युद्धाचा प्रसंग आहे. ही लांबची लढाई आहे. या खेळूया. युद्धाच्या वेळी जनरल झोपत नाही. अनपेक्षित घटितासाठी सज्ज राहावेच लागते.
- न्यूज चॅनल्स व नेत्यांची पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांना जे म्हणायचे होते ते म्हणून झाले. आता माझी बारी !

२७ जूनला सायंकाळी ६.०९ वा. विकी पंडितांनी विचारले-एवढे पुरावे आहेत म्हणता तर भारतात येऊन निर्दोषत्व का सांगत नाही?
५ मिनिटांत उत्तर : माझे हात बांधले जातील. तोंड बंद केले जाईल. ललितगेट बंद व्हावे की त्याचा भंडाफोड? तुम्हाला काय व्हावे वाटते?

नवे ट्विट : रैना, जडेजा सट्टेबाज
मोदींनी शनिवारी क्रिकेट जगतात खळबळ उडवणारा गौप्यस्फोट केला. ट्विट करून त्यांनी चेन्नई सुपरलीगचा रवींद्र जडेजा, ड‌्वेन ब्राव्हाे व सुरेश रैनावर आयपीएलमध्ये सट्टेबाजीचा आरोप केला. मोदींनी २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू व आयसीसीचे विद्यमान सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांना लिहिलेले पत्र अपलोड केले आहे. ‘जडेजा, ब्राव्हाे आणि रैनाच्या सट्टेबाज बाबा दिवाणशी घनिष्ठ संबंधांची मला माहिती आहे. मी या तिघांवरही आयपीएलमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालू इच्छितो’ असे त्यात म्हटले होते.