नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आधीच संकटात सापडेलेल्या काँग्रेसला आता यूपीएमध्ये मंत्री राहिलेले एक काँग्रेस नेते आणखी अडचणीत आणण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील राजकीय वर्तूळात चर्चा आहे, की हे संकट सहा इ-मेल्सच्या माध्यमातून समोर येणार आहे. राहुल गांधी आणि यूपीए सरकारमधील माजी मंत्री यांच्या दरम्यानचे हे सहा इ-मेल्स आहेत. सुत्रांची माहिती आहे, की हे इ-मेल्स उघड झाले तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होऊन कामकाजावर त्याचा परिणाम होईल. सुत्रांनी सांगितले, की माजी मंत्री काँग्रेसमध्ये असमाधानी आहेत आणि ते कधीही पत्रकार परिषद घेऊन हा मेल बॉम्ब फोडतील. त्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
कोण आहेत हे असंतुष्ट माजी मंत्री?
हे माजी मंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते, की रॉबर्ट वाड्रा यांचे नाव काही कथित घोटाळ्यात आल्यानंतर त्यांच्या बचावाची जबाबदारी काँग्रेसने या माजी मंत्र्यांवर दिली होती. एकदा तर त्यांना दिल्लीत येण्यासाठी एका विशेष विमानाची सोय केली गेली होती. सुत्रांच्या माहितीनुसार हे माजी मंत्री, काँग्रेस आता इतिहास झाला असल्याचा दावा, त्यांचे मित्र आणि माध्यमांकडे दबल्या आवाजात करत आहेत. आता इंदिरा गांधींनी पुन्हा जन्म घेतला तरी, त्या काँग्रेसला वाचवू शकणार नाही, असाही दावा ते खासगीत करत आहेत.
आरोपांपासून वाचण्यासाठी काँग्रेसने बनवला कोर ग्रुप
काँग्रेसचे माजी मंत्री नाराज असणे आणि ते इ-मेल्स लिक करण्याच्या वृत्तामुळे पक्ष अडचणीत सापडला आहे. काँग्रेस सदस्यांच्या अशा बंडखोरीवर नजर ठेवण्यासाठी पक्षाच्या तीन नेत्यांची एक समिती स्थापन करण्याच्या हलचाली सुरु आहेत. ही समिती खासदार आणि आमदारांवर आणि त्यांच्या हलचालींवर नजर ठेवणार आहे. तसेच एखाद्या सदस्याने बंडखोरी करत यूपीएच्या काळातील दस्तावेज उघड केले तर पक्षाची बाजू सांभाळून घेण्यासाठी ही समिती काम करेल. यूपीएच्या काळातील दहा नाराज माजी मंत्र्यांची यादीही या समितीने तयार केल्याची चर्चा आहे.