आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 जी प्रकरणी ‘पुस्तक बॉम्ब’; शौरी, टाटांना गोवण्यासाठी ‘सीबीआय’चा होता दबाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचे कारनामे उघड करणारा आणखी एक ‘पुस्तक बॉम्ब’ पडला आहे. ‘२ जी दूरसंचार परवाने देताना सहकार्य न केल्यास तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याला दिली होती,’ असा गंभीर आरोप ‘ट्राय’ चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. २ जी प्रकरणात मी अरुण शौरी व रतन टाटांना अडकवावे, अशी सीबीआयची इच्छा होती, असा दावाही त्यांनी केला.
घोटाळ्यांवर प्रकाश
२ जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात बैजल हेही एक आरोपी आहेत. त्यांनी या घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे एक पुस्तक स्वत:च प्रकाशित केले आहे. ‘द कम्प्लिट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स : २ जी, पॉवर अँड प्रायव्हेट एंटरप्राइझ - ए प्रॅक्टिशनर्स डायरी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. बैजल यांच्या या आरोपांबाबत मनमोहन सिंग यांची प्रतिक्रिया लगेचच मिळाली नाही.

आरोप फेटाळले
बैजल यांचे दावे काँग्रेसने फेटाळले आहेत. पक्षाच्या संवाद विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी हे उल्लेख कपोलकल्पित आणि खोटारडेपणा असल्याचे म्हटले आहे. स्वत: बैजल यांची कारकीर्दच वादग्रस्त असल्याचे सोदाहरण दाखले सुरजेवालांनी दिले.
काेण अाहेत बैजल?
टू जी घोटाळ्यातील अनेक गुपिते ‘द कम्प्लिट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स...’ या पुस्तकाच्या माध्यमातून उघड करणारे ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांच्यावरही या घोटाळाप्रकरणी आरोप होते. मात्र, यूपीए-२ सरकारच्या काळात त्यांना क्लीन चिट देत त्यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. बैजल यांच्यावर २००२ मध्ये एका हॉटेलच्या खरेदी प्रकरणात घोटाळे केल्याचाही आरोप होता. यापूर्वीच्या एनडीए सरकारमध्ये अरुण शौरी निर्गुंतवणूक मंत्री असताना त्या विभागाचे सचिव राहिलेले बैजल यांच्यावर निर्गुंतवणूक घोटाळ्यात आरोप झाले होते.
प्रदीप बैजल यांनी पुस्तकात केलेले आरोप असे
सीबीआयवर
सहकार्य केले नाही तर प्रत्येक प्रकरणात तुम्हाला हानी पोहोचवली जाईल, अशी धमकी सीबीआयने मला दिली होती.
यूपीएवर
मारन यांना माझ्या आणि पंतप्रधानांमधील चर्चेची पूर्ण माहिती होती. ते पंतप्रधान, चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांच्यासोबत काम करत होते. सीबीआय चौकशी कशी व्हावी, फाइल्स कशा हटवाव्या आणि त्याआधीच्या ‘ट्राय’विरोधात प्रसारमाध्यमांत खोटी वक्तव्ये कशी करावीत, याबाबत मार्गदर्शन करत.
दयानिधी मारन यांच्यावर
मारन मे २००४ ते २००७ या काळात दूरसंचारमंत्री होते. तत्पूर्वी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर परवाने दिले जात असत. मागील मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार मी युनिफाइड परवान्यांबाबत शिफारशी केल्या तर ‘गंभीर परिणाम’ भोगावे लागतील, अशी धमकी मारन यांनी मला दिली होती.
मनमोहन सिंगांवर
युनिफाइड परवान्याबाबत मी काही शिफारशी केल्या होत्या, मी नंतर पंतप्रधान मनमाेहन यांना भेटलो असता, ‘तुम्ही तुमच्या मंत्र्यांचे ऐकायलाच हवे, त्यांचा दृष्टिकोन विचारात घ्यायलाच हवा’, असे त्यांनी मला सांगितले. त्यांचा दृष्टिकोन मला प्रचंड संकटात टाकेल, असे मी त्या वेळी त्यांना म्हणालो होतो.
धमकी मिळाल्याचे टाटांनी सांगितले होते
‘टाटा स्काय-सन टीव्हीच्या विलीनीकरणाबाबत सहमती न दर्शवल्यास मी तुम्हाला संपवेन, अशी धमकी मारन यांनी दिली होती, असे टाटांनी मला २००४ मध्ये सांगितले होते. तरीही टाटांनी सहकार्य करण्यास नकार दिला. त्यांनी (सीबीआयने) मला, कुटुंबीयांनाही धमकी दिली होती. मी टाटा आणि अरुण शौरी यांना गोवले तर मला बक्षीस दिले जाईल,’ असे आमिष दाखवले होते.
काय म्हणाले बैजल...
- मी सर्वकाही सांगितले आहे. ते १०० टक्के खरे आहे आणि प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावेही आहेत.
- मारन, पंतप्रधानांना सहकार्य केले असते तर मी २ जी घोटाळ्यात दोषी ठरलो असतो आणि आज तुरुंगात असतो.
- वादग्रस्त आणि चुकीच्या निर्णयांवर काही सल्ला देण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा ‘दूरसंचार मंत्रालयाचा मीच पंतप्रधान आहे,’ असे मारन यांनी सुनावले होते, असा दावा बैजल या पुस्तकात करतात.

यूपीए २ ‘भ्रष्ट आघाडी’
^ मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालील यूपीए-२ सरकार म्हणजे ‘भ्रष्टाचाराची आघाडी’ होती, हे बैजल यांच्या आरोपावरून स्पष्ट होते.
प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री, कोईमतूरमध्ये
भ्रष्टाचारात आघाडी
^युपीए सरकारने केलेल्या घाेटाळ्यांचा या माध्यमातून पर्दाफाश झाला अाहे. यावर अाता फार काही बाेलण्यासारखे राहिलेले नाही.
-रविशंकर प्रसाद, दूरसंचार मंत्री
बातम्या आणखी आहेत...