आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 व्यक्ती, 3 चेक पॉइंट, 3 पडताळण्या; तरीही देशभर एटीएममधून बनावट नोटांचा ओघ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिल्‍ड्रन बँक ऑफ इंडिया आणि चुरन लेबल असलेल्‍या बनावटी नोटा - Divya Marathi
चिल्‍ड्रन बँक ऑफ इंडिया आणि चुरन लेबल असलेल्‍या बनावटी नोटा
नवी दिल्ली - दिल्लीच्या खानपूरमधील एसबीआयच्या एटीएममधून बँकेचे नाव लिहिलेल्या नोटा निघाल्या. यानंतर उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधून आणि हरियाणाच्या रोहतकमध्येही असाच प्रकार घडला. तिकडे मेरठमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधूनही अशा नोटा निघाल्या. या सर्व नोटांवर इंग्रजीत बँक ऑफ इंडिया लिहिलेले होते. या नोटा मिळणे थांबतात ना थांबतात तोच पुन्हा बनावट नोट, अर्धवट छापलेली नोट, स्कॅन्ड नोट, हाताने मजकूर लिहिलेली नोटा निघत आहेत.  
 
वरील सर्व उदाहरणे पाहता देशाच्या व्यवस्थेलाच कोणी आव्हान देतोय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात संघटित गुन्हेगारीप्रमाणे हे कृत्य सुरू आहे. ‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाचा छडा लावला असता लक्षात आले की, आरबीआयमधून एटीएमपर्यंत ९ व्यक्तींच्या निगराणीत नोटेची तपासणी होते. एवढेच नव्हे, तर एटीएम मशिन्समध्येही तांत्रिक पद्धतीने नोटेची तीन टप्प्यांत तपासणी होते. असे असताना देशभरात बनावट नोटांचा मुक्त संचार सुरू आहे. ‘दिव्य मराठी’ने याबाबत जबाबदार व्यक्तींशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी सध्या तपास सुरू आहे, असा सूर आळवला. अशा नोटा येतातच कशा, हे ते सांगू शकले नाहीत. दिल्लीस्थित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी (कम्युनिकेशन) रूपांबरा यांनी प्रकरण कायदा सुव्यवस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले.  

दिल्लीच्या संगमविहारमधील एटीएममधून अशीच नोट निघाली. पोलिसांना तसे कळवल्यानंतर त्यांचा विश्वास बसला नाही. शेवटी त्यांच्यासमोर एटीएममधून नोट काढावी लागली. दोन हजार रुपयांची चिल्ड्रन बँकेची नोट निघाल्यानंतर पोलिसांचा विश्वास बसला आणि गुन्ह्याची नाेंद केली. या प्रकरणात मोहंमद ईशा या आरोपीला अटक करण्यात आली. सुरुवातीस गुन्ह्यातील सहभागाचा नकार देणाऱ्या ईशाने नंतर कबुली दिली. खेळण्यातील केवळ पाच नोटाच टाकल्याचे त्याने मान्य केले.
 
आरोपी ईशाशी “भास्कर’ने संवाद साधला तेव्हा त्याने दीड वर्षापासून काम करत आहे. याआधी असे काही केले नाही, मग आताच कसा करेल, असे तो म्हणाला. पोलिस आणि कंपनीकडे ईशाविरुद्ध पुरावे नसल्यामुळे त्याला जामीन मिळाला. खटला खूप कमकुवत झाल्यामुळे पहिल्या सुनावणीतच त्याला जामीन मिळाला. विशेष म्हणजे एफआयआरमध्ये त्याचे नाव नाही आणि एटीएममधील सीसीटीव्हीहीही काम करत नव्हते. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला पाठवलेल्या ई-मेलला उत्तर मिळाले नाही. सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी हा सर्व प्रकार गंभीर ठरवला. “भास्कर’ला त्यांनी सांगितले की, देशाच्या वेगवेगळ्या भागांतून बनावट नोटा निघण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असावा. याची गांभीर्याने चौकशी व्हावी.  
 
नियमही तयार, पण अंमलच नाही 
२०१३ मध्ये आरबीआयने इंडियन बँक असोसिएशनवर रोकड नेणे-आणणे व एटीएममध्ये ती भरण्याबाबतची नियमावली तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. या कामास २ वर्षे लागली. २०१५ मध्ये रिझर्व्ह बँकेला नियमावली सोपवण्यात आली. मात्र, आजही ती मसुद्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. कायदेशीर अंमलबजावणीसाठी निर्णयच घेतला गेला नाही. “दैनिक भास्कर’ने एटीएममध्ये पैसे भरण्याचे नियम, मनाेरंजन बँक ऑफ इंडियाची नोट निघाल्यानंतर केलेल्या कारवाईसारख्या प्रकरणांवर रिझर्व्ह बँकेकडे ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून माहिती मागितली. मात्र, बँकेकडून उत्तर आले नाही.  

पैसे भरण्यासाठीची निश्चित प्रक्रिया नाही  
एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एका खासगी एजन्सीचा अधिकारी म्हणाला की, सुरक्षात्मक नियम नाहीत. बँक असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, एटीएममध्ये पैसे भरण्याबाबतच्या प्रक्रियेसाठी नियम नाहीत. एजन्सी आपला वेळ, पद्धतीनुसार पैसे भरते. या व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. याचा लोक गैरफायदा घेत आहेत. 

1. ओटीपीशिवाय कॅश ट्रे उघडला जातो 
एटीएममध्ये पैसे भरण्यास एजन्सीचा कर्मचारी आल्यानंतर कॅश ट्रे उघडण्यासाठी त्यास एक वन टाइम पासवर्ड मिळण्याची पद्धत असावी. कोण कधी आले ते कळले पाहिजे. ९९ % प्रकरणांत हा नियम प्रभावी ठरेल.  

2. एटीएम कॅश ट्रेची किल्ली एजन्सीला दिली  
कर्मचाऱ्याला कॅश ट्रेची किल्ली दिल्यामुळे तो  येतो आणि कुलूप उघडून पैसे टाकतो. एखादी उपद्व्यापी किंवा अप्रमाणिक व्यक्ती आल्यास रोकड टाकल्यानंतर सायंकाळी किंवा रात्री येऊन कुलूप उघडून गैरप्रकार करू शकतो.  

3. बनावट नोट ओळखण्यासाठी सेन्सर नाही  
सेन्सर असेल तर लिहिलेली नोट टाकू शकणार नाही. तो नोट टाकत असेल तर मशीन त्याला ओळखून बँकेला सतर्क करू शकते. मात्र, या प्रणालीसाठी पैसा लागेल. त्यामुळे बहुतांश बँका यावर चर्चाही करत नाहीत.  

4. दोन ठिकाणी एकच बंदूकधारी  बँकांत रोकड टाकण्यासाठी जी टीम जाते तेव्हा बहुतांश वेळा एकाच बंदूकधारी रक्षकावर काम भागवले जाते. ते दोघे असावेत, हा नियम आहे.  

5. सीसीटीव्ही नाही, असला तर तो नादुरुस्त   दोन वर्षांपूर्वी एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या संस्थांची पाहणी केली तेव्हा तीनपैकी दोन एटीएममधील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याचे दिसले.
 
बातम्या आणखी आहेत...