आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची केजरीवालांसमोरच आत्महत्या, त्यानंतरही ७८ मिनिटे झोडले भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेक आंदोलनाचे केंद्र असलेल्या दिल्लीतील जंतर-मंतरवर सर्वांच्या डोळ्यादेखत एका शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सगळे फक्त पाहत राहिले. कॅमेरे छायाचित्रे टिपत होते. वृत्तवाहिन्यांवर लाइव्ह कव्हरेज येत होते. आम आदमी पार्टीचे (आप) नेते व्यासपीठावरूनच पोलिसांना सल्ले देत राहिले. गजेंद्रचा जीव गेला.

जंतर-मंतरवरील आपच्या सभेसाठी गजेंद्र राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून आला होता. त्याच्या शर्टच्या खिशातून सुसाइड नोटही मिळाली आहे. त्यात त्याने पिकांची नासाडी हे आत्महत्येचे कारण सांगितले. गजेंद्रने गळफास घेतल्यानंतर तब्बल सव्वा तास आपची सभा सुरू राहिली. आपचे नेते कुमार विश्वास यांनी ‘प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटा’त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाषणासाठी निमंत्रित केले. केजरीवालांनी भाषणाच्या सुरुवातीलाच या घटनेचे खापर पोलिसांच्या माथी फोडले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्या गोंधळातच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोण होता गजेंद्र?
झागरवाडा गावचा ४२ वर्षीय गजेंद्र मॅट्रिकपर्यंत शिकला होता. त्याला २ मुले, १ मुलगी आहे. गावच्या राजकारणात सक्रिय होता. जयपूरला जातो असे सांगून घरून निघाला, पण दिल्लीला गेला. पगडी बांधण्यात माहिर होता. एका मिनिटात २० पगडी बांधण्याचा विक्रमही केला होता. वडिलांची १७ बिघा शेती आहे. बुधवारी त्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते.

‘जय जवान, जय किसान’...
‘मित्रांनो, मी शेतक-याचा मुलगा आहे. शेतातील पिक उद‌्ध्वस्त झाल्याने वडिलांनी मला घराबाहेर काढले आहे. मला तीन मुले आहेत. मित्रांनो, मी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील नांगल झागरवाडा गावचा आहे. मला घरी जाण्याचा उपाय सांगा. जय जवान, जय किसान ’ - गजेंद्र सिंह (सुसाइड नोटमध्ये )
डोळ्यादेखत तो झाडावर चढला. त्याला वाचवा, असे आम्ही पोलिसांना सांगितले. कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, याचे मला वाईट वाटते.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

या पुढे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना झाडावर चढायला सांगू. स्वत: झाडावर चढले नाही, ही त्यांची चूकच आहे. या कामांसाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते.
- आशुतोष, आपचे प्रवक्ते