नवी दिल्ली - स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांना पोलिसांनी मोर्चा सुरू होण्याच्या आधी अटक केली. यानंतर उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा यादव आणि त्यांच्या ८५ कार्यकर्त्यांना रेसकोर्स रोडवर अटक केली होती. सर्वजण पंतप्रधान निवासस्थानी नांगर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी मंगळवारी यादव आणि त्यांच्या समर्थकांना विशेष न्यायालयात उभे केले. उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली. त्यांनी पोलिसांवर धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप ठेवला. पोलिसांनी त्यांचा नांगर तोडला.
संजय सिंहांविरुद्ध घोषणाबाजी : योगेंद्र यादव यांची भेट घेण्यास आलेले आपचे नेते संजय सिंह यांच्याविरुद्ध यादव यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यामुळे ते यादव यांची भेट न घेताच माघारी परतले. सिंह म्हणाले, विरोध का केला याचे कारण मला माहीत नाही. आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचे होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आलो होतो. हे लोक माझ्याविरुद्ध घोषणाबाजी देत असल्याने मी परत जात आहे.
यादव समर्थकांची घोषणाबाजी, पोलिसांवर प्रचंड रोष
आंदोलनाची परवानगी होती
स्वराज अभियानाला दोन दिवस आंदोलन करण्याची परवानगी होती. सोमवारी रात्री त्यांनी १६ ऑगस्टपर्यंत आंदोलन वाढवण्याची परवानगी मागितली होती. डेडलाइन उलटून गेल्यानंतर आम्ही त्यांना जागा रिकामी करण्यास सांगितल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
माध्यमांपासून दूर ठेवले
पोलिसांनी योगेंद्र यादव यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासून रोखले, त्यांना मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अटकेनंतर संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेऊन तिथे त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी आरोप फेटाळले आहेत. काही वेळानंतर यादव व कार्यकर्त्यांना विशेष दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले.
सुटका हे तर अगदी छोटे यश
यादव यांनी आपली सुटका एक छोटे यश असल्याचे म्हटले आहे. आमच्याविरुद्धचे सर्व आरोप रद्द करण्यात आले आहेत. आम्ही रेसकोर्सकडे मोर्चा नेणार नव्हतो. १५ ऑगस्टपर्यंत जंतरमंतरवर प्रतीकात्मक आंदोलन करणार होतो. ही कृती गुन्हा ठरते काय, असा सवाल करत यादव यांनी पोलिस अधिकाऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. दिल्लीचे पोलिस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
शांततामय आंदोलन हा हक्क
अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव यांचे समर्थन करत शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा मूलभूत हक्क असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबतचा अहवाल मागवावा, असेही ते म्हणाले.