आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feeling Broke Down Before The Water Crises In Uttarakhand

उत्तराखंडमधील जलप्रकोपापुढे संतापाची ढगफुटी; 20 हजार यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/डेहराडून - महाप्रलयात उत्तराखंडमध्ये नेमके किती लोक मृत्युमुखी पडले याचा अजूनही अंदाज आलेला नाही. वाचले त्यांना स्थानिक प्रशासनाकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याने प्रचंड रोष आहे. राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, मदतकार्यातील या दिरंगाईची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून राज्य सरकारने 25 जूनपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. लष्कराने आतापर्यंत फक्त 20 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. अजूनही 50 ते 60 हजार लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, मृतांची संख्या काही हजार असू शकते, अशी भीती राज्याचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी व्यक्त केली.


25 जूनला पुन्हा प्रलयाचा इशारा : उत्तराखंडमध्ये 25 जून रोजी पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बचाव कार्यात व्यस्त अधिका-यांनुसार ढिगारे उपसण्याचे काम 25 ते 30 दिवस चालेल.
90 धर्मशाळा उद्ध्वस्त : केदारनाथ धाममध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या 90 धर्मशाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. याशिवाय, भारत सेवा आश्रम, काली कमली धर्मशाळा, गढवाल मंडळ विकास प्राधिकरणाचे विश्रामगृह उद्ध्वस्त झालेले आहे. या इमारतींमध्ये हजारो योत्रेकरू थांबलेले होते.


तेव्हाच यात्रेकरूंना थांबवले असते तर...
दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला मुसळधार पावसाचा इशारा कळवण्यात आला होता. यात्रेकरूंना तेव्हाच थांबवले असते किंवा इशारा दिला असता तर कदाचित 2 हजारांवर लोकांचे प्राण वाचले असते, असे बिहारचे माजी आरोग्यमंत्री अश्विनी चौबे म्हणाले. ते स्वत: चार दिवस केदारनाथ मंदिरात अकडून पडले होते. या महाप्रलयात 15 ते 20 हजार लोक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला.


मदत कार्य आणि वास्तव
- बचाव कार्यात 55 हजार जवान.
- लष्कर, हवाई दलाचे 45 हेलिकॉप्टर.
- आतापर्यंत 20 हजार लोकांना हलवले.
- 50 ते 60 हजार लोक अजूनही अडकलेले
- केदारनाथजवळच्या 60 गावांची अजून माहितीच नाही.
- गुप्तकाशी, कुंड आणि अगस्त्य मुनि गावांत बचाव पथकच पोहचू शकलेले नाही.
- रामबाडामधील हजारो व्यावसायिकांचा ठावठिकाणा नाही.


विखुरलेले मृतदेह ओलांडत जीव वाचवला...
केदारनाथमध्ये सर्वत्र मृतदेह पसरलेले आहेत. ते उचलण्यासाठी माणसे नाहीत. जो वाचला तो हे मृतदेह ओलांडून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. मंदिरातही मृतदेह पडले आहेत... आम्ही पण तीन दिवस तेथेच अडकून होतो. काही लोकांचा तर अन्न आणि औषधांअभावी जीव गेला...
अश्विनी चौबे, भाजप आमदार, बिहारचे माजी आरोग्यमंत्री


मराठवाड्यातील 256 जणांशी अद्यापही संपर्क नाही
मराठवाड्यातून 550 यात्रेकरून गेले असून 294 जणांचा नातलग किंवा प्रशासनाशी संपर्क झाला आहे. उर्वरित 256 भाविकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यात औरंगाबाद जिल्ह्यातील 70 जणांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्तालयामार्फत संपर्कासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या यात्रा कंपन्यांमार्फत भाविक गेले आहेत त्यांचे संचालक, प्रतिनिधींशी बोलणे होत आहे. मात्र, अनेक जण खासगी वाहनांनी गेल्याने नेमकी संख्या अद्याप स्पष्ट होत नाही, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.


मराठवाड्यातील जिल्हानिहाय चित्र
यात्रेकरू संपर्क झाला
औरंगाबाद 131 70
बीड 82 61
उस्मानाबाद 43 32
लातूर 33 33
परभणी 41 17
जालना 42 25
नांदेड 175 52
हिंगोली 08 04
एकूण 550 294