आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flood News In Marathi, Bihar, Divya Marathi, NDRF

उत्तर भारतात पुर प्रकोप; 89 ठार, 19 लाख लोकांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुसळधार पाऊस व पुरामुळे उत्तर प्रदेशानंतर आता बिहार-आसाममधील परिस्थितीही गंभीर झाली आहे. या तीन राज्यांतील 37 जिल्हे पुराच्या कचाट्यात सापडले असून 19 लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. पुरामध्ये मृत्युमुखी पडणारांची संख्या 89 वर गेली आहे. पूरग्रस्त भागात एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य हाती घेतले आहे.

नेपाळमधील बॅरेजेसमधून 10 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे उत्तर प्रदेशातील राप्ती आणि घागरा नदीला पूर आला आहे. घागरा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत चालली आहे. या नदीच्या पूरक्षेत्रातील परिस्थिती आणखी बिकट होण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. बिहारमध्ये कोसी, कमला व आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली आहे.

बिहार : नितीशकुमारांचे गावही पुरात बुडाले
बिहारमध्ये कोसी, गंडक, बुढी गंडक, बागमती व कमलाबलान नद्यांना पूर आला आहे. मात्र माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नालंदा जिल्ह्यातील गाव बेलची आणि बेतिया, पूर्व चंपारण्य, सिवान आणि गोपाल गंजसह 13 जिल्ह्यांना पुराने वेढले आहे. तेथील 5.8 लाख लोकांना फटका बसला आहे. पुरामध्ये 1 लाख 763 घरे वाहून गेली आहेत तर आतापर्यंत 22 जण मृत्युमुखी पडले आहेत. या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची 9 पथके तैनात करण्यात आली आहेत. पाटणा शहरातील अनेक भागांतही पुराचे पाणी शिरले आहे.

यूपी : परिस्थिती हाताबाहेरच
यूपीत दहा जिल्ह्यांत पुराने 28 जण ठार झाले. बहराइच व श्रावस्ती जिल्ह्यात स्थिती आणखी बिघडली. शरयू, राप्ती, घागरासारख्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने 73 निवारा छावण्या आणि 77 पूर चौक्या सुरू केल्या आहेत.

आसाम : काझीरंगात पाणी
ब्रह्मपुत्रा, उपनद्यांच्या पूरमुळे 14 जिल्ह्यांसह काझीरंगा उद्यानातही पुराचे पाणी शिरले. यामुळे वन्यजीव वाहून गेल्याची शक्यता आहे. पुरामुळे 17 टक्के शेती पाण्याखाली गेली आहे. सुमारे साडेतीन लाख लोकांना फटका बसला आहे.

उत्तराखंड : मदत आणि बचावकार्यात अडथळे
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. कुचबिहारमधील पूरस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तेथील जलढाका व गदाधर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओरिसातील केंद्रपाडामध्ये 3600 पूरग्रस्तांपर्यंत प्रशासनाची मदत अजूनही पोहोचलेली नाही. त्यामुळे ते पडझड झालेल्या घरांची डागडुजी करू शकलेले नाहीत. उत्तर काश्मीरमधील कुपवाडामध्ये भूस्खलन झाल्याने पाच घरे जमीनदोस्त झाली आहेत.